रेल्वे तपासणी दरम्यान दोन व्यक्तींच्या ताब्यातून 3,70,500 रुपये किंमतीचा गांजा जप्त ;


भुसावळ – अकोला रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या बॅगेज स्कॅनर मशीनमध्ये दिनांक 26.10.2024 रोजी तपासणी दरम्यान दोन व्यक्तींच्या ताब्यातून 24.700 कि.ग्रा. गांजा, अंदाजे किंमत ₹3,70,500/- जप्त केला

अकोला रेल्वे स्थानकावर ऑपरेशन नार्कोच्या अंतर्गत, दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असलेल्या शिफ्टमध्ये दक्षिण बाजूस असलेल्या बॅग स्कॅनर मशीनवर बंदोबस्त ड्युटी दरम्यान, भुसावळ मंडल प्रवासी सुरक्षा निरीक्षक व MSF स्टाफच्या देखरेखी खाली बॅग तपासणी सुरू होती. सुमारे रात्री 8:45 वाजता बॅग स्कॅनिंग मशीनमध्ये तीन बॅग तपासताना स्क्रीनवर काही संशयास्पद वस्तू असल्याचे लक्षात आल्यावर दोन व्यक्तींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तत्काळ स्टाफने पाठलाग करून त्यांना पकडले.

या व्यक्तींनी नाव विचारल्यावर त्यांनी भिकू अब्राहम मंडल व जुबैल मंगा, दोघेही ओडिशा येथील असल्याचे सांगितले. या बॅगमध्ये गांजासारखी मादक द्रव्य असल्याचा संशय आल्यावर लगेचच जीआरपी अकोला निरीक्षक व सहायक सुरक्षा आयुक्त, आरपीएफ भुसावळ यांना माहिती देण्यात आली. यानंतर जीआरपी निरीक्षक व स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, अकोला नायब तहसीलदार श्री. राहुल वसावे यांना पाचारण करून त्यांच्या उपस्थितीत पंचासमोर बॅग तपासणी केली असता, बॅगमध्ये खाकी टेपने बांधलेले 12 गठ्ठे आढळले. या बंडलना पंचासमक्ष ओळख पटवून त्यांना कात्रीने उघडून तपासले असता त्यामध्ये अंमली वासाचा व बीजांचा ओलसर गांजा आढळला.

या बॅगमधील गांजाचे पंचांसमक्ष वजन केल्यावर, त्याचे एकूण वजन 24.700 किलो आढळले, ज्याची अंदाजे बाजार किंमत ₹3,70,500/- इतकी आहे. या गांजाच्या जप्तीची कार्यवाही जीआरपीच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत पंचनामा करून, आरोपींना व जप्ती पंचनाम्यातील वर्णनासह पुढील कार्यवाहीसाठी जीआरपी/अकोला यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

या प्रकरणी जीआरपी/अकोला येथे CR नंबर 406/2024, U/S 8, 20(b) NDPS Act अंतर्गत दिनांक 26.10.2024 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास जीआरपी अकोला करत आहे