भुसावळ, –

भुसावळ गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत आहे. त्यातच आता भुसावळमध्ये नकली नोटांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या आठवड्यातच तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा बनावट नोटा आढळून आल्या असून बाजारपेठ पोलिसांनी ५० हजाराच्या या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ४ सप्टेंबरला भुसावळ शहरात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तीन जणांना तीन लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले होते. या संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पुन्हा ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारपेठ पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
संशयित सय्यद मुशाईद अली मुमताज अली याच्याकडे अधिक चौकशी केली असता, नोटा घेण्यासाठी चिखलदरा येथील संशयित राहुल राजेंद्र काबरा याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी बऱ्हाणपूर येथे गेला व संशयित प्रतीक नवलखे (रा. मालविया वार्ड, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) बनावट नोटा छापून व्यवहार करतो, अशी माहिती दिली.
दरम्यान संशयित अब्दुल हमीद कागल याची चौकशी केली असता त्याने सय्यद मुशाईद अली मुमताज अली (रा. जळगाव) याचा मित्र राहुल काबरा याने कागल याच्याकडे महिन्यापूर्वी ५० हजारांच्या बनावट नोटा दिल्याची कबुली दिली. त्यावरून बाजारपेठ पोलिसांनी कागल याच्या घरातून बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मात्र संशयित राहुल काबरा व प्रतीक नवलखे गुन्हा घडल्यापासून फरार झाले आहेत. आठवड्याभरातच भुसावळमध्ये दुसऱ्यांदा बनावट नोटा सापडल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


