भुसावळकरांना मोठा दिलासा : आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यानंतर कर मूल्यांकन प्रक्रियेला स्थगिती –

भुसावळ – भुसावळ पालिकेने 2024-2024 वर्षांसाठी मालमत्ता पुर्नमुल्यांकनासाठी नागपूरचा कंत्राटदार नेमल्यानंतर संबंधित एजन्सीने अनागोंदी कारभाराचे प्रदर्शन करीत धार्मिक स्थळांनाही नोटीसा देत देवी-देवतांच्या चरणी कर पत्रक ठेवल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती तर शहरातील नागरीकांनाही अव्वाच्या-सव्वा मालमत्ता पुर्नमुल्यांकनापोटीचे कर पत्रक दिल्याने भुसावळकर संतप्त झाले होते. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी या संदर्भातत् तक्रार केल्यानंतर कर मूल्यांकन प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भात शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांनी आदेश काढले आहेत.
वाढीव करांच्या विरोधात भुसावळातील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात कर पत्रकांची होळी करीत पालिकेचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली होती तर शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे शहरप्रमुख दीपक धांडे यांच्या नेतृत्वात शहरात आंदोलन करण्यात आले होते.
शहरात संबंधित एजन्सीकडून कर मागणीपत्रक वाटप होताना दिसल्यास थेट चोप देण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी दिल्याने त्यावेळी खळबळ उडाली होती.
भुसावळ पालिकेने शहरातील मालमत्तांच्या रीव्हीजनसाठी नागपूरच्या एजन्सीला कंत्राट दिले मात्र संबंधित कंत्राटदाराने मालमत्तेेच्या मोजमापात अधिक क्षेत्र, मालमत्तांचे फोटोंमध्ये तफावत, बांधकामाच्या प्रकारातील तपशीलातही गोंधळ केल्याने नागरीक संतप्त झाले व भाजपाने याप्रश्नी पालिका आवारात कर मागणी पत्रकांची होळी करीत पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
शहरातील मालमत्तांचे रिव्हीजन करताना अव्वाच्या सव्वा दराने करवाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष होता मात्र आमदार संजय सावकारे यांनी संबंधित विभागाकडे या संदर्भात पाठपुरावा केल्याने कर मूल्यांकन प्रक्रियेला तूर्तास स्थगिती मिळाली आहे व किमान वर्षभरात असलेली विधानसभा निवडणूक व पालिका निवडणूक पाहता नागरिकांना एक वर्ष तरी करवाढीपासून दिलासा मिळेल यात शंकाच नाही.