भुसावळात पाईपलाईन फुटली ; आगामी दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प ; महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा परिणाम

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील जलशुध्दीकरण केंद्रातून नाहाटा महाविद्यालय चौफुलीवरील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी १४ इंची पाईपलाइन सोमवार १६ रोजी सकाळी महामार्गाच्या कामामुळे फुटली. यामुळे शहरातील दक्षिण भागाला आगामी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठप्प होणार आहे. दरम्यान जोडणीनंतर बुधवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती सूत्राणी दिली.
दक्षिण भागाचा पाणीपुरवठा ठप्प
शहरातील दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नाहाटा महाविद्यालय चौफुलीवरील जलकुंभाला जलशुध्दीकरण केंद्रातून १४ इंची पाईपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने सोमवारी सकाळी पाईपलाइन फुटली, यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. दरम्यान पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे, पाणी पुरवठा सभापती शोभा नेमाडे आदींनी पाहणी केली. पाईपलाईन जिर्ण व जूनी असल्याने तसेच महामार्गाच्या खोदकामात या पाईपलाइनला असलेला मातीचा सपोर्ट निघाल्याने ती फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान महामार्ग प्राधिकरणाने ही पाईपलाइन जोडून द्यावी, यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला आहे, असे असले तरी ही पाईपलाइन जोडण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागेल, यामुळे शहरातील दक्षिण भागाला आता बुधवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. दोन दिवस दक्षिण जामनेररोडवरील दोन्ही बाजूंच्या सर्व विस्तारीत वस्त्या, खडकारोड अर्थात रेल्वे रुळांच्या दक्षिणेकडील भागांना टंचाई सोसावी लागणार आहे.
कोरोना व्हायरसचे सावट सर्वत्र असतांना शहरात नेमकी पुन्हा पाइप लाइन फुटली , एकीकडे स्वच्छता पाळा, हात धुवा , कपडे स्वच्छ ठेवावी आदी खबरदारीच्या उपाययोजना शासन देत आहे तर भुसावळ शहरात आठ दिवसांनी पाणी येते .आता पुन्हा पाइप लाइन फुटल्याने दक्षिण भागात किमान दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही . नागरिकांनी नेमकी काय व कोणती खबरदारी घ्यावी हा प्रश्न भुसावळकरांना चांगलाच भेडसावत आहे . तुर्तास वाट पाहणे यावर विश्वास ठेवत आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी स्थिती नागरिकांची झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *