अमळनेर- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकारास माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना आज निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. अत्याचार झाल्याच्या या घटनेने संपूर्ण देश अस्वस्थ होऊन सर्वत्र पडसाद उमटले आहेत. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा “व्हाईस ऑफ मीडिया” या पत्रकार संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आज निवेदन देण्यात आले. यावेळी साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, सहसचिव ईश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडे, उमेश धनराळे, बापूराव पाटील, कमलेश वानखेडे, दयाराम पाटील व जयेशकुमार काटे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.


