शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसाठी बनावट ॲपद्वारे नऊ लाखात गंडवले : भुसावळमधून एकजण ताब्यात ;

सावदा –

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतच आहे. त्यातच शेअर मार्केटचे गुंतवणुकीसाठी बनावट अप्लिकेशन बनवून भोपाळ येथील एकाची नऊ लाख ३५ हजारांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी संशयितास जळगाव जिल्ह्यातील सावदा येथून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे वास्तव्यास असलेला संशयित अनिकेत दत्तात्रय बऱ्हाटे याने शेअर मार्केटचे अप्लिकेशन बनविले होते. त्यात भोपाळ येथील एका जणांशी संपर्क करून शेअर मार्केटच्या अँपमध्ये पैसे गुतविण्याचे आमिष दाखविले. चांगला परतावा मिळण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने पैशांची गुंतवणूक केली होती.

मात्र काही दिवसांनी या ॲप्लिकेशनमध्ये जमा झालेली रक्कम तक्रारदार काढण्यासाठी गेले असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भोपाळ गुन्हे शाखेत फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान भोपाळ गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे बनावट अकाउंट तयार करणाऱ्या संशयितांचा शोध घेतला असता भुसावळातील अनिकेत बऱ्हाटे याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. अनिकेत हा सावदा शहरात असल्याची माहिती भोपाळ गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने सावदा पोलिस ठाणे गाठत संशयित अनिकेत बऱ्हाटे याला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.