जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकार्‍यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर –

जळगाव : गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सेवा देणार्‍या जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकार्‍यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले.

या अधिकार्‍यांना पदक जाहीर
विशेष सेवा पदक मिळणार्‍या अधिकार्‍यांमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस ठाण्याचे रंगनाथ धारबळे, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे उद्धव डमाळे, पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस मुख्यालयातील सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांचा समावेश आहे.

कुणाल सोनवणे यांना राष्ट्रपती शौर्य पदक
चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल ऑपरेशनदरम्यान केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. सोनवणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे 2019 ते 2021 यादरम्यान नक्षली चकमकींना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर सोनवणे यांनी फैजपूर येथे काम पाहिले. सध्या ते चोपडा येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वीही केंद्रीय गृह विभागाच्या वतीने अंतर्गत सुरक्षा पदक, खडतर सेवा पदक, पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह असे पुरस्कार मिळाले आहेत.

जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झाले आहे. 3 ऑगस्ट 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या काळात ते जळगावचे पोलिस अधीक्षक होते.
जळगाव जिल्हा पोलिस दलात केलेल्या विशेष सेवेबद्दल सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांना 2022-2023 या वर्षासाठीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 1991 मध्ये पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेले वाघ सध्या धुळे जिल्ह्यात सहायक फौजदार म्हणून काम पाहत आहे. 34 वर्षांच्या सेवेत त्यांना चार पदकं मिळाले आहेत. जळगावातील शनिपेठ, जळगाव शहर पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालयात प्रशिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. तसेच नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीतील प्रशिक्षण केंद्रात 11 वर्षे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. 2021-22 या वर्षात क्यूआरटीच्या जवानांनाही त्यांनी प्रक्षिक्षण दिले. त्यांना आतापर्यंत पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह, केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट प्रक्षिक्षक पदक, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहे. आता राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.