भुसावळ – भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघ आणि शिक्षक पालक संघाची संयुक्त सभा नुकतीच झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक अध्यक्षस्थानी होते. दोन्ही समित्यांचे प्रा.डॉ.संजय बाविस्कर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थित पालकांचे तसेच माजी विद्यार्थी यांचे स्वागत समिती सदस्य प्रा.डॉ.जगदीश चव्हाण व प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी केले. पालकांपैकी गोविंद विसपुते, अजय भालेराव, दिलीप सराटे यांनी आपली मनोगते सादर केले. माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी मयूर महाजन म्हणाला की, प्राध्यापक आणि प्राचार्य हे विद्यार्थ्यांशी अत्यंत खेळीमेळीने वागतात. येथे आल्यावर आपण आपल्या घरीच आहोत असे वाटते. म्हणून शिक्षण संपलेले असले तरी मी माझ्या संपर्कातील तरुण तरुणींना येथेच प्रवेश घेण्याचा सल्ला देतो.

दिनेश भंगाळे यांनी त्यांच्या पहिल्या बॅचच्या आठवणींना उजाळा दिला आणि प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे त्यांना विविध प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांनी त्याचा लाभ घेतल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी अपुर्या सुविधा आणि अनुदान नसतानाही कशा पद्धतीने अडचणीमधून वाटचाल करीत महाविद्यालयाची प्रगती साध्य केली याची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.डॉ.दयाघन एस राणे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी दिला. प्रास्ताविक प्रा.संगीता धर्माधिकारी तसेच आभार प्रा.डॉ.संजय बाविस्कर यांनी मानल्याचे महाविद्यालयाच्या प्रसिध्दी समिती प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आहे.


