भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे वीज चोरी दंड न भरणार्‍या चौघांविरोधात गुन्हा दाखल –

यावल – दि १०: ओझरखेडा, ता.भुसावळ या गावात 12 एप्रिल रोजी विद्युत वितरण कंपनीकडून विविध चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये त्यांना चार जण वीज चोरी करताना आढळून आले. या चौघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र, या चौघांनी वेळेत दंड अदा न केल्यानंतर त्यांच्याविरोधात यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ओझरखेडा, ता.भुसावळ येथे वरणगाव ग्रामीण कक्ष 2 च्या सहाय्यक अभियंता कविता निलेश लखोटे यांच्या नेतृत्वात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. 12 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजेपासून ही मोहिम सुरू झाली. यात सुनील लक्ष्मण झोपे, नीलिमा नितीन झोपे, मोहम्मद अबूबकर व सावनकुमार यादव हे चौघे वीज चोरी करताना आढळले. या चौघांनी 1 हजार 132 युनिट वीज चोरी केल्याने त्यांना 27 हजार 430 दंड आकारणी करून चौघांना नोटीस देण्यात आली व दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र या चौघांनी वेळेत दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता कविता लखोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासाकरिता हा गुन्हा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.