जळगाव लग्न समारंभातून नववधूचे चार लाख 60 हजारांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही रविवार, 14 जुलै रोजी दुपारी तीन वाजता घडली. जळगाव एमआयडीसीतील सुरभी लॉन येथे लग्न समारंभादरम्यान झालेल्या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश गुलाबराव जाधव (52, रा.कोल्हे नगर, जळगाव) यांच्या मुलीच्या लग्नाचे आयोजन एमआयडीसीतील सुरभी लॉनमध्ये रविवार, 14 जुलै रोजी करण्यात आले. नववधूचे सर्व दागिने, रोकड आणि मोबाईल एका पिशवीत ठेवून सतीश जाधव यांच्या पत्नीकडे संभाळण्यासाठी दिले होते. त्यांनी ते दागिने हॅण्डबॅगमध्ये ठेवलेले होते. दरम्यान दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास लग्न समारंभ कार्यक्रम सुरू असताना सतीश जाधव यांच्या पत्नी या काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांच्या हातातील दागदागिन्यांची हॅन्डबॅग हॉलच्या एका कोपर्यात ठेवली होती मात्र त्या काम आटोपून बॅगेकडे आल्या असता त्यांना दागिन्यांची बॅग दिसून आली नाही. लग्न समारंभात संपूर्ण शोधाशोध करत नातेवाईकांनी विचारपूस करण्यात आली. परंतु दागिन्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

अखेर सतीश जाधव यांनी रात्री 8 वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे.


