भुसावळ – जळगाव जिल्ह्यासह आणि जिल्ह्याबाहेरील भागात जाऊन दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना बोदवड पोलिसांनी भुसावळ व वरणगाव शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विजय पुंडलिक माळी यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीए ५१८७) ही चोरी झाल्याची घटना १९ जून रोजी दुपारी घडली होती. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी भुसावळ शहरातील जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे वय-३१ याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बोदवड पोलिसांनी जितेंद्र सोनवणे याला अटक केली. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने ही चोरी त्याचा सहकारी रुपेश ज्ञानेश्वर चौधरी रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव ता. भुसावळ यांच्यासोबत केल्याचे कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी रुपेश चौधरी याला वरणगाव शहरातून अटक केली. दरम्यान दोघांची कसुन चौकशी केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या भागात जाऊन त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. बोदवड पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश जाधव, गुन्हे शोध पथकातील पोउनि सुधाकर शेजोळे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गुरचळ, शशिकांत शिंदे, पोलीस नाईक शशिकांत महाले, भूषण सोनवणे यांनी कारवाई केली आहे.


