अमळनेर,

वेल्डिंगचे काम करीत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील आर. के.नगर परिसरात घडली. शाहीद सादिक शेख (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अमळनेर येथील मिल चाळ परिसरातील रहिवासी असलेला शाहीद सादिक शेख आजारी असल्याने आपल्या घरीच आराम करीत होता. मात्र, कामावर गेलेला त्याचा मोठा भाऊ शाकीरला पाण्याची बाटली देण्यासाठी तो कामाच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या भावाला कामात मदत करण्यासाठी तोदेखील कामाला लागला. त्यावेळी शाहीद सादिक शेख हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडला.
दरम्यान शाहीद सादिक शेख याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.


