शाळेत चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू : अमळनेर शहरातील घटना :

अमळनेर –

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन हा शाळेत संध्याकाळी साडेचारच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने त्याचे दुर्देवी निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता नववीत शिकत असणारा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन ( वय १५ ) हा संध्याकाळी शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. यावेळी शिक्षकांनी त्याला सावरले व स्थानिक डॉक्टरांनी तपासणी करत त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरीत अमळनेर येथे दवाखान्यात भरती केले असता त्यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.

घनश्याम हा अत्यंत मनमिळावू आणि हुशार होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील शेतकरी असल्याने तो शाळेबरोबरच त्यांना शेतातही मदत करीत असे. सर्वांच्या आवडीचा असलेल्या घनश्याम च्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घनश्यामच्या कुटुंबाने प्रचंड आक्रोश केला. त्याच्या पश्चात आईवडील, आजी आजोबा काका व दोन बहिणी असा परिवार आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.