धक्कादायक ; व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून ७ मुलींवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

भोपाळ ;-व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून त्यांना शिष्यवृत्तीची ऑफर देणारी महिला महाविद्यालयाची प्राध्यापक असल्याचे सांगत शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून सात आदिवासी मुलींवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय आरोपीला मध्य प्रदेशपोलिसांनी अटक केली आहे . त्यानंतर आरोपीने जंगलात नेऊन आदिवासी मुलींवर अत्याचार केले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ब्रजेश प्रजापती आणि इतर दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार पीडित विद्यार्थिनी पुढे आल्या आहेत. यासह आरोपीने आणखी तीन महिलांवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. एका प्रकरणात आरोपीने एक विद्यार्थिीनी आणि तिच्या अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी त्यांच्यावर पॉक्सो कायदाही लावण्यात आला आहे. २४ मे रोजी प्रजापतीची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपी हा मजूर असल्याचे समोर आलं आहे. आरोपीने यूट्यूबवर आवाज बदलण्याचं ॲप्लिकेशन कसे वापरायचे हे शिकून घेतले होते. त्यानंतर त्यान सहआरोपी राहुल प्रजापती आणि संदीप प्रजापती यांच्या मदतीने पहिल्या पीडितेचा फोन नंबर मिळवला, असे पोलिसांनी सांगितले. “आरोपीने विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे पैसे देण्याचे आश्वासन देऊन एका वेगळ्या ठिकाणी बोलावले. आपण एक महिला महाविद्यालयातील प्राध्यापक असल्याचे आरोपीने आवाज बदलून सांगितले होते. फोनवरुन बोलणाऱ्या आरोपीने विद्यार्थिनींना माझा मुलगा तुम्हाला भेटेल आणि आमच्या घरी घेऊन जाईल असे सांगितले होते. तिथेच त्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळतील असेही सांगितले होते. त्यानंतर आरोपी पीडितेला जंगलातील एका निर्जन ठिकाणी न्यायचा. तिथे तो त्याच्या कुटुंबातील एका पडक्या झोपडीत त्यांच्यावर बलात्कार करायचा,” अशी माहिती पोलिसांनी दिली.