भुसावळात परशुराम जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा -महिलांचे लेझीम, ध्वज, यष्टी पथक ठरले आकर्षण :

भुसावळ : परशुराम जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील कल्याण येथील ढोल पथकासोबतच महिलांचे लेझीम पथक, यष्टी पथक व ध्वज पथक यांनी येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेतले. ब्राम्हण समाजातर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर समाज बांधव व महिलांचा समावेश होता.

शोभायात्रेने वेधले लक्ष
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भगवान श्री परशुरामांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता अष्टभुजा देवी मंदिर या ठिकाणी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने डॉ.कमलकांत शास्त्री तसेच पुरुष समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी व सर्व पदाधिकारी तसेच महिला समितीच्या अध्यक्षा मेघा वैष्णव व सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत भगवान परशुरामांची आरती करून शोभायात्रेस सुरुवात सुरूवात झाली.

यंदाच्या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ब्राह्मण समाजातील महिला व युवतींचे यष्टी पथक, ध्वज पथक व लेझीम पथक तिघही पथकांच्या प्रमुख अनघा अनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांचे उत्कृष्ट सादरीकरण लक्षवेधी ठरले. शोभायात्रेदरम्यान अग्रसेन चौकात अग्रवाल समाजातर्फे शोभा यात्रेचे स्वागत करून पाणी व शीतपेय वाटप करण्यात आले. पुढे एचडीएफसी बँकेतर्फे सरबताचे आणि गुजराती हॉटेलचे संचालक कपिल मेहता यांनी शीतपेय वाटप केले. रात्री दहावाजता शोभायात्रेचा समारोप म्युन्सीपल पार्क भागातील श्रीराम मंदिरात झाला.