भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन


भुसावळ – भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त, समस्त ब्राह्मण समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात भगवान श्री परशुरामांच्या चरणी चार पुष्प अर्पण करण्यात आले असून भगवान श्री परशुराम जन्मोत्सव प्रकटोत्सव समिती 2024 मध्ये पुरूषांसह प्रथमच महिला समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.
कार्यक्रमात पहिले पुष्प दि. 7 मे 2024 रोजी स्थानिक ब्राह्मण संघात सायंकाळी 5 वाजता आध्यात्मिक प्रश्नमंजुषा स्वरूपात झाले. दुसरे पुष्प दि. 8 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ब्राह्मण संघ येथे भजन आणि नृत्य स्पर्धेच्या अंताक्षरीच्या स्वरूपात अर्पण केले गेले. तर तिसरे पुष्प आज गुरूवार दि.9 मे 2024 रोजी भव्य मोटार सायकल रॅली श्री साईबाबा मंदिरापासून जामनेर रोड येथून सायंकाळी 5 वाजता नाहाटा कॉलेज मार्गे सिंधी कॉलनी, पांडुरंग टॉकीज, बाजार पेठ पोलीस स्टेशन पुलाखालून, वसंत टॉकीज चौक, गांधी पुतळा, तापी नदी किनार्‍यावरील श्री भगवान परशुराम मंदिरात रॅलीचा समारोप होईल. तर चौथे शेवटचे पुष्प मिरवणूक उद्या शुक्रवार दि. 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता श्री अष्टभुजा माता मंदिर, जामनेर रोड येथून भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण मुंबई येथील ढोल पथक यास स्थानिक महिलांचे लेझीमपथक आणि ध्वज पथक तसेच भगवान श्री परशुरामजींची 6 फूट सुंदर मूर्ती (प्रतिमा) आणि भगवान श्री परशुरामांची सजीव आरास व पालखी देखील राहणार असून घोडे-बग्गी आणि सजावटीसह ही मिरवणूक वाल्मीक नगर, महाराजा अग्रसेन चौक, बाजारपेठ पोलीस स्टेशन ते पुलाखालून, श्री महाराणा प्रताप चौक, कुलकर्णी प्लॉट मार्गे म्युनिसिपल पार्क मधील श्रीराम मंदिरात समाप्त होईल. या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन समितीतर्फे गौरविण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना सर्व समाज बांधवांनी व सर्व ब्राह्मण समाजाने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन भगवान श्री परशुराम जन्मोत्सव प्रकटोत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी व समिती सदस्यांनी केले आहे.