मुंबई : धुळ्यासह जालना येथील लोकसभेसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जालन्यात भाजपाच्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसने डॉ.कल्याण काळे तर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या डॉ.सुभाष भामरेंविरोधात डॉ.शोभा बच्छाव यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. उमेदवारी जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला आहे.

मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा 21-17-10 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती दिली. तसंच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली होती.
महाविकास आघाडी 17 जागांवर लढणार
नंदुरबार, धुळे, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई, मुंबई उत्तर पूर्व अशा एकूण 17 जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढणार असून यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, माढा, अहमदनगर दक्षिण, रावेर, भिवंडी, बीड, वर्धा, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 21 जागा लढणार असून यामध्ये जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या मतदारसंघांचा समावेश आहे.


