भुसावळ : स्नेहयात्री प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे 23 आणि 24 मार्च रोजी दोन दिवसीय ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा भुसावळातील रेल्वेच्या श्री कृष्णचंद्र सभागृहात होतील. दोन दिवसीय स्पर्धेत राज्यभरातून नाटक संघ सहभागी होत आहे.

14 नाट्यसंघांचा सहभाग
23 आणि 24 मार्च या दोन दिवसात राज्याच्या विविध शहरातून सहभाग नोंदवणारे 14 नाट्यसंघ एकूण 14 एकांकिका सादर करतील. दर्जेदार, आशयघन आणि संवेदनशील विषयांवरचे दमदार सादरीकरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असेल. 14 एकांकिकेतून जवळपास 200 कलावंत व तंत्रज्ञ आपली कला सादर करतील. स्पर्धेतील विजेत्या संघांना सांघिक व वैयक्तीक अशा स्वरुपाची 51 हजार रुपयांची रोख बक्षीसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. सर्व सहभागी कलावंत व तंत्रज्ञांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील. स्पर्धेचे परिक्षक म्हणून नाट्यक्षेत्रातील प्रतिथयश कलावंत उपस्थित राहणार आहे.
शनिवारी उद्घाटन
शनिवार, 23 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता शहरातील प्रतिथयश मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. तत्पूर्वी दुपारी 10 वाजेपासून संध्याकाळपर्यंत नाशिक, नगर, पुणे आणि जळगाव येथील एकूण 6 नाट्यसंघ आपल्या कलाकृती सादर करतील. रविवार, 12 मार्च रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सलग मुंबई, नाशिक, डोंबिवली, अंधेरी, सोलापूर, नाशिक येथील एकूण 8 नाट्यसंघ आपल्या एकांकिका सादर करतील.
23 मार्चला भुसावळकरांसाठी पुन्हा एकदा ‘झेंडूचं फुल’ नाटकाची मेजवानी
स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ‘झेंडूचं फुल’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग शनिवार, 23 मार्च रोजी रात्री 8 वाजता श्री कृष्णचंद्र सभागृहतच सादर होईल. महाराष्ट्र शासनाचे नाट्यलेखनाचे पारितोषिक प्राप्त ‘झेंडूचं फुल’ हे नाटक अस्सल खान्देशी बोलीभाषेतून सादर होईल. आशयघन कथानक, दर्जेदार सादरीकरण आणि सशक्त अभिनयाने प्रेक्षकांना हसता हसता अंतर्मुख करणारे हे बहुचर्चित नाटक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा सादर होणार आहे. सदरचा नाट्यप्रयोगाकरीता प्रवेश मोफत असेल.
रविवारी स्पर्धेचा समारोप
रविवार, 24 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेला स्नेहयात्री प्रतिष्ठानच्या स्थानिक कलावंताचा स्नेहरंग हा नृत्य, गायन आणि मिमीक्राचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सोबतच शहरातील मान्यवरांच्या व मालिका क्षेत्रातील कलावंतांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होईल.
सांस्कृतिक मेजवानीच्या लाभाचे आवाहन
स्पर्धेच्या आयोजन समितीत जयेंद्र लेकुरवाळे, मुकेश खपली, रामचंद्र डहाके, प्रा.गिरीश कुलकर्णी, नारायण माळी, धनराज कुवर, अक्षय माधवपूरकर, आदर्श पंडा, संजय यावलकर, राजेश पाटील यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या व्यवस्थापन समितीत मानसी पाटील, नवरत्न डहाके, अजय पाटील, समृध्दी पाटील, रितेश वानखडे, तुषार जोशी, शर्मिला पाटील, कुणाल बावीस्कर, भाग्यश्री बावीस्कर, खुशाल निंबाळे आदी परिश्रम घेत आहेत. स्पर्धेकरीता व नाट्यप्रयोगासाठी रसिकांना प्रवेश मोफत आहे. भुसावळकर रसिकांनी या दोन दिवसीय दर्जेदार सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख हरीश कोळी आणि स्नेहयात्री प्रतिष्ठानचे सचिव विश्वजीत घुले व अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी केले आहे.


