बीएलओच्या मानधनात वाढ करा महासंघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन –

भुसावळ – बीएलओच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी बुधवार रोजी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघा तर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ गत अनेक वर्षांपासून निवडणूक संदर्भात आणि निवडणूक आयोगाने सुचविलेली सर्व कामे प्रामाणिकरित्या अविरतपणे आदेशानुसार पार पाडत आहेत. तालुक्यातील सर्व मतदार याद्यांची प्रसिद्धी तसेच शुद्धीकरणाची कामे तर संपूर्ण वर्षभर न चुकता पार पाडत असतात. निवडणूक आयोगाच्या सर्व सुचनांचे आणि आदेशांचे कधीही उल्लंघन न करता सर्व बीएलओ वर्षभर राबून या राष्ट्रीय कामास यशस्वीपणे पार पाडतात. मात्र अशा निरंतर चालणाऱ्या कार्याचे मानधन केवळ सहा हजार रुपये आहे. मानधन तुटपुंज्या स्वरूपाचे आहे. तसेच पाच वर्षेपर्यंत किंवा पाच वर्षांपेक्षा जास्त काळ बीएलओ म्हणून कार्यकाळ असलेल्या कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर बदलण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तालुका अध्यक्ष गणेश लोखंडे, जिल्हा सचिव जीवन महाजन ,विजय झोपे, रामकृष्ण इतवारे, नरेश मुर्हेकर, समीर तडवी, आसीफ बेग, हितेश सरोदे, नवाब तडवी, तेजेंद्र महाजन, किशोर माचवे उपस्थित होते.