भुसावळ – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने मीटिंग घेऊन एक अभूतपूर्व निर्णय जाहीर केला. यामध्ये समाजातील घटत्या मुलींच्या प्रमाणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक तरुणांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लेवा पाटील समाज कन्या जन्माचे स्वागत करणार आहे. कोविड 19 मुळे अनेक कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून भोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळ यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष अँड प्रकाश पाटील यांनी हा ठराव मांडला, व या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सर्व संचालकांनी त्याला अनुमोदन दिले. यामध्ये जानेवारी 2019 नंतर जन्मलेल्या आलेल्या गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा व लग्नाचा खर्च समाज करणार आहे. समाजातील सामाजिक काम करणाऱ्या सर्व संस्था व समाजातील भातृमंडळे यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या झालेल्या मीटिंगमध्ये अध्यक्ष अँड प्रकाश पाटील, सचिव डॉ बाळू पाटील शरद फेगडे, चेतन पाटील, नितीन धांडे, आरती चौधरी, स्वाती भोळे हजर होते. हा उपक्रम कुटुंबनायक रमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.



