रियल हिरो :भुसावळातील थरार : डीवायएसपी यांची ‘ धडाकेबाज ‘ एंट्री : जिवाची पर्वा न करता वाचवले तरुणाचे प्राण : तिघांच्या मुसक्या आवळल्या :

भुसावळ : तरुणीला पळवून नेण्यास मदत केल्याच्या संशयातून तरुणाच्या नातेवाईकावर प्राणघातक हल्ला करण्याच्या प्रयत्नात संशयित असतानाच भुसावळचे कर्तव्यदक्ष व धडाकेबाज पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी जिवाची पर्वा न करता क्षणाचाही विलंब न करता तत्परतेने धावत्या वाहनातून उडी घेत संशयितांना दूर लोटल्याने तरुणाचे प्राण वाचले. या हल्ल्याप्रकरणी सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे . भुसावळातील जामनेर रोडवर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या दवाखान्यासमोर सुमारे सात जणांचे टोळके हे एकाला बेदम मारहाण करीत होते व एकाने मोठी फरशी उचलून तरुणाच्या डोक्यात टाकणार त्याचवेळेस जेवणासाठी वाहनातून घराकडे निघालेले डीवायएसपी कृष्णात इंगळे यांनी थरारक दृश्य बघितले व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावत्या वाहनातूनच धडाकेबाज एंट्री घेत फरशी घेतलेल्या संशयितासस जोरात धक्का दिल्याने अप्रिय घटना टळली.

शनिवारी दुपारी शहरातील जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या हॉस्पीटलवरील गारखेडा येथील युवक अकाश राजेश बेलदार (मोहिते) हा त्याच्या मित्रासह मोटर सायकलने जात असतांना त्याला 7 ते 8 जणांनी अडवून थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. आकाश याला सर्व हल्लेखोर मिळून फायटर, बुक्यांनी मारहाण करीत होते. यामुळे आकाश याच्या तोंडालाा, गालास, डोळ्याजवळ, जबर मार लागला. यात तो जखमी झाला व सोबतचा सहकारी याला डोक्याला मार लागला. रस्त्यावर सुरू असलेली फ्रिस्टाईल हाणामारी अनेक जण पाहत होते मात्र सोडविण्यास कोणीही पुढे येत नव्हते. याच वेळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे हे कार्यालयातून घरी जेवणास जात होते. त्यांनी हाणामारी पाहताच क्षणाचाही विलंब न करता संशयितांच्या हातातील फरशी हिसकावत त्यांना दूर लोटले.
दरम्यान डीवायएसपी पिंगळे हे घटनास्थळी धावत जात असल्याने हल्लेखोरांसोबत जखमी सुध्दा पसार झाला. यावेळी डीवायएसपी पिंगळे यांनी तत्काळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात माहिती देऊन डीबी पथक व पोलिस अधिकारी यांना घटनास्थळी बोलावले. जखमी आकाश याचा पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांना तो ट्रामा केअर सेंटर येथे मिळून आला. पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, उमाकांत पाटील, प्रदीप पाटील, यासीन पिंजारी यांनी जखमीचा जबाब नोंदविला. याप्रकरणी सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.