पुणे : पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळील दुर्गा कॅफे लगत शनिवारी सायंकाळी गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सराफा व्यावसायीकावर आर्थिक कारणावरून गोळीबार करण्यात आला असून नंतर संशयिताने रीक्षातून जाताना स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. शनिवार, 10 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिल ढमाले (52, रा.बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफाचे तर आकाश गजानन जाधव (42, रा.बाणेर) असे जखमी दुकानमालकाचे नाव आहे.

आर्थिक वादातून टोकाचे पाऊल
अनिल ढमाले हे सराफ व्यवसायीक आहेत. जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव यांनी ढमाले यांना हे दुकान भाड्याने दिले आहे. अनिल ज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमाले चालवत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी जाधव यांच्या दुचाकीवर बसून ढमाले येत होते. ज्युपिटर हॉस्पिटलजवळ मागे बसलेल्या ढमाले याने जाधव यांच्या डोक्यात आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर ढमाले याने तेथून पळ काढला. त्याने एक रीक्षा केली व रिक्षाचालक सतीश यादव याला रिक्षा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याकडे घेण्यास सांगितले व रीक्षा चालकाला पाणी मागितल्यानंतर तो बाहेर निघताच स्वतःवर गोळी झाडली.
आर्थिक त्रासामुळे केली हत्या
पोलिसांनी ढमाले याची झडती घेतली असता सुसाईड नोट मिळाली. त्यात त्याने तीन महिन्यांपासून ढमाले याला जाधव आर्थिक कारणावरुन त्रास देत होता. आता मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत आहे, असे त्यात म्हटले आहे. ढमाले यांच्याकडे पिस्तुलचा परवाना असून त्याच पिस्तुलाने त्याने गोळीबार करीत स्वत:ही आत्महत्या केली आहे.


