राज्यातील 9-12 वीच्या सर्व शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण : शिक्षक सक्षमीकरण : राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर होईल प्रशिक्षण वर्ग :

जळगाव – इयत्ता 9 ते 12 वीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी एकूण 12 विषयांवर आधारीत क्षमता वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रारंभी राज्य, त्यानंतर जिल्हा व तालुका पातळीवर हे प्रशिक्षण होणार असून त्या माध्यमातून शिक्षकांचा व्यावसायिक विकास साधण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक सक्षमीकरणावर भर देण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण व कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक यांचा विचार करता राज्यातील 9 ते 12 वीच्या सर्व शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यासाठी विविध 12 विषयांवर आधारीत सत्रांचे प्रशिक्षण घटकसंच व वाचन साहित्याची रचना करण्यात आली असून प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांना हे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. घटकसंच व वाचन साहित्य निर्मितीत काम करणारे राज्यभरातील विविध तज्ज्ञ या प्रशिक्षणात राज्यस्तरीय सुलभक तथा तज्ज्ञ मार्गदर्शक राहतील. जळगाव जिल्ह्यातील डॉ. जगदीश पाटील यांनी घटकसंच व वाचन साहित्य निर्मितीत काम केलेले असल्याने राज्यस्तरीय सुलभक म्हणून ते भूमिका पार पाडणार आहेत.

असे आहेत 12 सत्र – क्षमता वृद्धी प्रशिक्षण विषयनिहाय नसून एकात्मिक स्वरूपाचे आहे. त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण, एनसीएफ क्रॉस कटींग, कुमारवयीन मुलांचे भावविश्व उलगडताना, क्षमता आधारीत मूल्यांकन व शाळास्तर मूल्यांकन, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग, कृतिसंशोधन व नवोपक्रम, अनुभवजन्य व खेळाधारित अध्यापनशास्त्र, एकविसाव्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, एनएएस-पीजीआय-एसईएएस कार्यपद्धती व विश्लेषण, प्रभावी शैक्षणिक नेतृत्व व नाविन्यपूर्ण उपक्रम अशा 12 विषयांवर आधारीत सत्र आहेत.

जळगाव जिल्ह्यातून 12 प्रशिक्षक – क्षमता वृद्धी प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रतिभा भावसार, अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरंदले, अध्यापक विद्यालयाचे डॉ.वाय.व्ही. पाटील, प्रा. संजय नन्नवरे, प्रा. जागृती भोळे, विषय साधन व्यक्ती प्रशांत सोनवणे, माध्यमिक शिक्षक डॉ. मीनल झोपे, डॉ. नरेंद्र महाले, केंद्रप्रमुख शुभांगी पाटील, उच्च माध्यमिक शिक्षक जे.पी. बडगुजर व डॉ. अतुल इंगळे यांचा समावेश आहे.