अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्रतिष्ठापना –

अयोध्येत भव्य मंदिरात रामलल्लांची प्रतिष्ठापना – अयोध्या : गेल्या अनेक शतकांची प्रतीक्षा आज अखेर संपुष्ठात आल्यानंतर सोमवार, 22 रोजी मुहूर्तावर रामलल्लांची भव्य मंदिरात सनई चौघड्यांच्या निणानाद प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले. देशभरात सर्वत्र ढोल-ताशांच्या गजरात रामनामाचा जयघोष करण्यात आला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. पाच मंडपातून पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या गाभार्‍यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात करण्यात केली. प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला. गणपती पूजन करून रामललांचे पूजन, प्राणप्रतिष्ठा, अभिषेक करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदी यांंनी चांदीचा एक मुकूट श्रीरामचरणी अर्पण केला. प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा झाली.

दिग्गज, मान्यवरांची लाभली उपस्थिती
या सोहळ्यासाठी देश-विदेशातील सुमारे 7140 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना-विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तसेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह उद्योगजगतातील मान्यवर उपस्थित होते. बागेश्वर बाबा यांच्यासह साधू-संत, महंत यांची विशेष उपस्थिती होती.