जळगाव – तालुक्यातील तिघे्र येथील गट नं. 191/1 या गायरान जागेचा अनधिकृत वापर केल्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार दिली होती. याबाबत तहसीलदार अर्पित चौहान यांनी अधिकार्यांची समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी दि. 6/9/2023 रोजी जळगाव तालुक्यातील तिघ्रे गावातील गट नं.191/1 या गुरचरण (गायरान) या जागेवर आयुष प्रोकॉन प्रा.लि. गुजरात यांनी 3/1/2019 पासून अनधिकृत वापर सुरू केला होता. याची तक्रार आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. सदरील प्रकरणाची तलाठी तिघ्रे व संबंधित अधिकारी यांना माहित असून सुध्दा त्यांनी पदाचा गैरवापर करून उपविभागीय अधिकारी जळगाव यांना चुकिचा अहवाल पाठविला होता. वास्तविक गायरान जागा ही सक्षम अधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणासही वापरास अथवा बदलास व हस्तांरणास बंदी असते असे उतार्यावर नमुद असतांना सुध्दा आयुष प्रोकॉन प्रा.लि. यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे जागा मागणीचा प्रस्ताव दिला असता जाणून बूजून तात्कालीन अधिकारी व कर्मचारी यांनी प्रलंबीत ठेवला. मात्र तलाठी तिघ्रे यांनी 3/1/2020 रोजी दंडात्मक प्रकरणाची अकारणी करून मिळणेबाबतचा अहवाल मंडळाधिकारी यांना दिला. याबाबत तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी सदरच्या अहवालाची कुठलीही खातरजमा न करता 10/02/2020 रोजी क्र.अनबिशे/ई/टपाल/2020/33/150/2 अन्वये आदेश देवून आयुष प्रोकॉन यांना दंडाची नोटीस बजावून लाखो रूपये शासनाच्या खजिन्यात अनधिकृतरित्या भरून घेतले.
सदरची केलेले अतिक्रमण हटविण्यास आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही, तरी सदरच्या गायरान जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे शासन परिपत्रक व मा.उच्च न्यायालयाचे आदेश असतांनासुध्दा तत्कालीन अधिकारी यांनी प्रलंबित ठेवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला. तरी संबंधितांवर चौकशीचे आदेश देण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याबाबत उपअधिक्षक भुमि अभिलेख, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी म्हसावद, तलाठी पिंप्राळा यांची समिती तहसीलदार अर्पित चौहान यांनी नेमुन सदरच्या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले आहेत.



