भुसावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : आरोग्य यंत्रणा सज्ज -भुसावळ ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार : अ‍ॅन्टीजन टेस्ट वाढवल्या

भुसावळ : तब्बल अडीच वर्षानंतर कोरोनाने पुन्हा भुसावळ तालुक्यात शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथील रुग्णाला नेपाळ येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असलीतरी आरोग्य यंत्रणेने नागरीकांना सतर्क राहण्याचे इशारा दिला आहे. भुसावळातील ग्रामीण रुग्णालयासह ट्रामा सेंटरमध्ये 20 बेडचा आयसोशन वॉर्ड तसेच ऑक्सीजन यंत्रणा आरोग्य विभागाने सज्ज ठेवली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विवेक कुरकुरे यांनी दिली.

ग्रामीण रुग्णालय ऑयसोलेशन वॉर्ड
भुसावळ तालुक्यातून कोरोना हद्दपार झाल्यानंतर नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला होता मात्र आता पुन्हा कुर्‍हेपानाचे गावातील 43 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. भुसावळातील ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून ऑक्सीजन जनरेशन सिस्टीमही सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या शिवाय पाच ऑक्सीजन सिलिंडरची सज्जता असल्याचे सूत्रांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा म्हणून पाच डॉक्टर्स, 14 सिस्टर , 7 वॉर्डबाय व चार स्वीपर तैनात आहेत.

रॅपीड टेस्ट वाढवल्या
भुसावळ शहर व परीसरातून दररोज 10 ते 15 सर्दी व खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. या रुग्णांच्या लागलीच रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या जात आहेत. साकेगाव, भुसावळ या परीसरातून अधिक रुग्णांचा समावेश असल्यो सांगण्यात आले. ताप व खोकल्याच्या रुग्णांना औषधी देण्यासह त्यांची अ‍ॅन्टीजनही केली जात आहे मात्र अद्याप कुणालाही कोरोनाची लागण नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना टाळण्यासठी ही घ्या काळजी
साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ आणि वारंवार धुवा.
डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. आपले हात बर्‍याच पृष्ठभागांना स्पर्श करत असतात. त्यातून हाताला विषाणू चिकटू शकतात. अशा हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यास हाताला चिकटलेले विषाणू तुमच्या शरीरात जाऊ शकतात.
खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. टिश्यू पेपर नसेल तर कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा. वापरलेला टिश्यू तात्काळ कचरापेटीत टाका. खोकताना किंवा शिंकताना अशाप्रकारे तोंडावर किंवा नाकावर टिश्यू पेपर ठेवला तर विषाणू पसरणार नाहीत आणि इतरांना त्यांची लागण होणार नाही.
शिंकेतून किंवा खोकल्यातून विषाणू पसरून त्याची इतर कुणाला लागण होऊ नये, यासाठीच दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मीटर अंतर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
घराबाहेर पडल्यावर कुणाशीही हस्तांदोलन करू नका. त्याऐवजी हात हलवून, वाकून नमस्कार किंवा हात जोडून नमस्कार करा.