भुसावळ – अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला ज्ञान देण्याचे काम श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेल्या, चार वेदांची जननी असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेने केलेले आहे. त्यामुळे आज हा ज्ञानरूपी यज्ञाचा लाभ सर्वांनाच मिळत असल्याने अशी ज्ञान देणारी गीता प्रत्यक्ष भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मयमूर्तीच असल्याचे प्रतिपादन गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी येथे केले.

भुसावळ येथील दुर्गा कॉलनीत आयोजित गीता जयंतीनिमित्त गीतापठण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. चंद्रकांत महाराज आपल्या प्रवचनात म्हणाले की, गीता ही जगाची कल्याण करणारी असून मोक्षदायिनी आहे. गीतेचे वाचन करणारे हे गीतेचे म्हणजेच भगवंताचे सोयरे असतात. गीतेतील एका अक्षराचे वाचन केल्यास एक अश्वमेध यज्ञ पूर्ण होतो, असे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे नित्यनूतन ज्ञान देणारी गीता वाचणारा मला प्रिय आहे, असे भगवंत म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने श्रद्धेने गीता वाचावी असे आवाहन चंद्रकांत महाराज यांनी केले. गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रारंभी गीतेचे पूजन करण्यात येऊन त्यानंतर 51 महिलांनी गीतेचे पठण केले. महिलांनी 700 श्लोकांचे वाचन करून गीता वाचन व श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी हभप लक्ष्मण महाराज, हभप प्रेमचंद फेगडे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.


