भुसावळ: सुसंस्काराचा मनाचा रिमोट तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून वाईट चैनल लागणार नाही. मुलांनो हिरव्या चाफ्यासारखं व्हा! या फुलांचा सुगंध इतका मधुर असतो की तो लोकांना स्वस्थ बसू देत नाही. या फुलांच्या शोधात लोक लांबून येतात. चटकन दिसणारी फुले एकदा सापडली की आनंद द्विगुणीत होतो. मुलांनो तुमचं जगणं, तुमचं कर्तुत्व असं करा की तुम्हाला लोकांनी हिरव्या चाफ्याप्रमाणे शोधलं पाहिजे असा सल्ला साहित्यिक व.पु.होले यांनी भावी पिढीला दिला.

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे आज दिनांक ९ रोजी दादासाहेब आर. जी. झांबरे विद्यालय येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे अंतिम पुष्प सावद्याचे साहित्यिक प्रा.व.पु.होले यांनी गुंफले. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी, संस्थेचे सेक्रेटरी बी.जी.सरोदे, एस.आर.झांबरे, प्रकाश झांबरे दीपक चौधरी, एस.डी.बाविस्कर, मुख्याध्यापक एस.बी.कुमावत, डॉ.संजू भटकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसमन्वयक प्रा. शाम दुसाने यांनी तर सूत्रसंचालन मनीष गुरुचळ यांनी केले आणि आभार प्रकल्प प्रमुख शैलेंद्र महाजन यांनी मानले.
निसर्ग नियमानुसारच जगले पाहिजे
सर्व सजीव निसर्ग नियमानुसारच जगतात. फक्त मनुष्यप्राणी निसर्ग नियमानुसार जगत नाही. जीवन जगताना अंगी ज्ञान, कौशल्य, जिद्द, चिकाटी आत्मविश्वास, संवेदनशीलता, स्वयंशिस्त, स्वावलंबन, उद्यमशीलता असे विविध गुण अंगी बाळगून मनुष्याने निसर्ग नियमानुसार जगले पाहिजे असे व.पु.होले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. ‘माणसा माणसा कधी होशील माणूस’ कवयित्री बहिणाबाई यांच्या ओळींची आठवण करून देताना आपणास साने गुरुजींनी सांगितलेली माणसे घडवायची असल्याचे ते म्हणाले.
.
वयोमानानुसार जबाबदाऱ्या स्वीकारणारा खरा हुशार
व.पु. होले यांनी पुढे मार्गदर्शन करताना सांगितले की परीक्षेत पहिला नंबर येणे म्हणजे तुम्ही हुशार आहात असं नसून हुशार तो जो वयोमानानुसार येणाऱ्या जबाबदाऱ्या शंभर टक्के पार पाडतो.
प्रबोधनमालेसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगावचे उद्योजक अजय बढे आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी के.नारखेडे विदयालयाचे माजी मुख्याध्यापक म.सी.हळपे, जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश विसपुते, अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश्वर घुले, समाधान जाधव, प्रदीप सोनवणे, कुंदन वायकोळे, देव सरकटे, हितेंद्र नेमाडे, सचिन पाटील, तेजेंद्र, महाजन, भूषण झोपे, अंतर्नादचे अध्यक्ष संदिप पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


