*गिरडची शुभांगी बनली बँकेत अधिकारी , घरची परिस्थिती गरिबीची असताना देखील मिळवलं यश, प्रतिकूल परीस्थितीत विविध स्पर्धा परीक्षेत हमखास यशस्वी कसे होवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शुभांगी मनोरे*.
भडगांव
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड या गावामध्ये प्राथमिक शिक्षण झालेल्या शुभांगी रामकृष्ण मनोरे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफीसर म्हणुन निवड झाली . प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनात प्रतिकूल परिस्थिती असतानाही काहीतरी करून दाखवण्याची जिद्द , चिकाटी आणि हिंमतीच्या बळावर तिने हे यश प्राप्त केले. गिरड , पाचोरा, जळगाव या ठिकाणी विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी तिला भ्रमंती करावी लागली . घरची परिस्थिती साधारण , अवघी दीड एकर शेती, त्यात कुटुंबाची गुजराण , आई -वडील शेतमजुरी करीत असताना तिने प्राप्त केलेले हे यश नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे . अभ्यासाबरोबर शुभांगीने वडिलांना शेतकाम करण्यात व आईला घरकाम करण्यात सातत्याने मदत केली. आपल्या या यशाचे श्रेय तिने आपल्या आई-वडिलांना दिलेले आहे. आई-वडिलांनी दिलेल्या भक्कम पाठिंबा, आत्मविश्वास ,तसेच राजेश पाटील सर , संदिपकुमार साळूंखे सर यांच्या पुस्तकातून मिळालेली प्रेरणा यामुळे संघर्ष करण्याची हिम्मत मिळाली .
शुभांगीला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती . तिने अनेक आत्मचरित्रे , प्रेरक पुस्तके वाचली . पदवीचं शिक्षण घेत असताना सातत्याने तिचे हे वाचन सुरू होते. सुरुवातीला तिने जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची ठरवले तेव्हा तिच्या ध्यानीमनीही नव्हते की आपल्या या प्रवासात जवळपास 20 मुख्य परीक्षा द्याव्या लागतील. तिच्या आयुष्यात शुभांगीने अनेक प्रकारच्या परीक्षा दिल्या. सुरूवातीला नियोजन चुकल्याने म्हणा किंवा अतिआत्मविश्वासामुळे म्हणा , तिला सतत अपयश येत गेले . बँकाच्या परीक्षांबद्दल ऐकून सुरूवातीला या परीक्षा कठीण वाटत होत्या पण प्रत्यक्ष जेव्हा बँकेच्या परीक्षा देण्यास प्रारंभ केला , प्रयत्न केले तर आपण या परीक्षांमध्ये सहज यश प्राप्त करू शकतो , त्या दृष्टीने तिने नियमितपणे सराव सुरू केला, प्रामाणिकपणे व सातत्याने अभ्यास सुरु ठेवला. वेळोवेळी संबंधित सहकारी आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. शारीरिक व मानसिक स्वास्थ चांगले राहावे यासाठी नियमितपणे योगासने सुरू केली . नियमित अभ्यास व सरावामुळे तिची भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये विकास अधिकारी म्हणून निवड झाली.परंतु तेवढ्यावर तिने समाधान मानले नाही, तिचा अभ्यास सुरूच होता , दुसऱ्या चांगल्या नोकरीची अपेक्षा तिने ठेवली होती आणि ऑक्टोबर 2023 मध्ये बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर म्हणून तिची नियुक्ती झाली.

ग्रामीण भागात राहून शेतकरी कुटुंबातील शुभांगीने जे यश प्राप्त केलेले आहे ते निश्चितच गौरवास्पद आहे. सुप्रसिद्ध खान्देशी अधिकारी, “ताई मी कलेक्टर होई नू” या पुस्तकाचे लेखक राजेश पाटील सर (IAS), “हम होंगे कामयाब ” या पुस्तकाचे लेखक व IRS अधिकारी संदीप कुमार साळुंखे सर , विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करण्यास उपलब्ध असणारे डॉ उज्वल कुमार चव्हाण सर (IRS) , योगेश पाटील सर ( IRTS), Mpsc girls ग्रुप च्या मानसीताई पाटील ( उपजिल्हाधिकारी ) शुभांगीचे प्रेरणास्रोत आहेत तसेच मिशन IAS जळगावचे विभागीय संचालक प्रवीण पवार सर यांच्या सतत संपर्कात राहून मिळालेले योग्य मार्गदर्शन यामुळे शुभांगीने हे यश मिळाल्याचं सांगितलं. शुभांगीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी तसेच विद्यार्थ्याना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शनाची गरज भासल्यास संपर्क करण्याचे आवाहन मिशन IAS जळगाव व खान्देशी अधिकारी ग्रुप चे समन्वयक प्रविण पवार चाळीसगाव (9422562981) यांनी केले आहे.


