भुसावळ : शहरात बंद घरांना चोरट्यांकडून टार्गेट केले जात असून वाढत्या चोर्या-घरफोड्यांमुळे नागरीक धास्तावले आहेत. खडका रोडवरील फळ विक्रेत्याचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाखांच्या रोकडसह दोन लाखांचे दागिने मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती फळ विक्रेत्याने दिली. दरम्यान, पोलिसांची गस्त भेदून चोर्या-घरफोड्या होत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फळ विक्रेते दानिश अब्दुल रहेमान बागवान (30) हे पत्नी व भाऊ, वहिनीसह खडका रोडवरील लाल बिल्डींगजवळ अन्सार उल्ला मशिदीजवळ वास्तव्यास आहेत. 17 रोजी व्यारा (गुजरात) येथील नातेवाईकांचे निधन झाल्याने बागवान परीवारातील सर्व सदस्य शुक्रवारी दुपारी तीन वाजता घराला कुलूप लावून रवाना होताच चोरट्यांनी संधी साधली. घराच्या खिडकीची जाळीतून हात घालत दरवाजाला लावलेली साखळी ओढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घराच्या कपाटातील दोन लाखांची रोकड तसेच महिलेची सोन पोत, हार, गळ्यातील चैन, लहान मुलांच्या अंगठ्या असा एकूण चार लाखांचा ऐवज लांबवला.
सोमवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास बागवान परीवारातील सदस्य घरी आल्यानंतर त्यांना घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसताच त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. सोमवारी सकाळी बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह डीबी पथकातील कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी केली. जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


