भुसावळ – सर्व देवांमध्ये महादेव हा भोळा देव आहे. भोळा असूनही तो चक्रवर्ती आहे. महादेवाच्या केवळ नामस्मरणाने अनेक दोषांपासून मुक्ती होते आणि चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. नित्यनेमाने महादेवाच्या नामाचा जप करून नामस्मरण केल्यास मानसिक आनंद मिळतो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले.
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात श्री गुरूदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित साप्ताहिक व्याख्यानात ‘वाचे वदता शिवनाम’ या विषयावर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते व सचिव महादेव हरीमकर उपस्थित होते. प्रारंभी गुरूदेव श्रीदत्तप्रभू यांच्या प्रतिमेला डॉ. जगदीश पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यशोदाताई पाटील यांनी जप सादर केला. दिनकर जावळे यांनी डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय करून दिला. पुरूषोत्तम मेंडकी यांनी मनोगत व्यक्त केले. विजय चौधरी यांनी ‘शिव भोळा चक्रवर्ती’ या अभंगाचे गायन केले. महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. जगदीश पाटील यांचा संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉ. जगदीश पाटील आपल्या व्याख्यानात म्हणाले की, संत एकनाथ महाराज यांनी शिव नामाचा महिमा अभंगातून सांगितला आहे. भोळा शिव हा चक्रवर्ती देव असून त्यांच्या नामस्मरणाने षड्विकारांची बाधा होत नाही. तसेच महादेवाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरूषार्थांची प्राप्ती होते. तसेच शिवनामाचे सातत्याने स्मरण करत राहिल्यास मृत्यूची भीतीही नष्ट होत असते. त्यामुळे आपल्याला मानसिक आनंद व मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर शिवनामाचे स्मरण अखंडितपणे केले पाहिजे, असेही डॉ. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. अध्यक्षीय मनोगत प्रकाश विसपुते यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन महादेव हरीमकर यांनी तर आभार सुपडू कुरकुरे यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



