वरणगाव – चांगदेव येथून देव दर्शन घेऊन नेमाडे दांपत्य हे भुसावळ कडे मोटरसायकलवरून जात असताना झालेल्या अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . या दरम्यान शहरातील ढाके दांपत्य हे भुसावळला जात असताना अपघात स्थळी महिला मदतीचा आक्रोश करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी इतरांच्या मदतीने जखमींना वरणगांव ग्रामीण रुग्णालयात पोहचविले . मात्र हा अपघात कसा घडला हे मात्र स्पष्ट झाले नाही .

या बाबत वृत असे भुसावळ शहरातील नव महाराष्ट्र स्टोअर्स व टिपटॉप टिव्ही सेंटरचे संचालक ललीत प्रभाकर नेमाडे ( ४८ ) व नीता ललीत नेमाडे ( ४२ ) हे दोघे पती पत्नी शुक्रवार दि ५ रोजी सकाळच्या सुमारास चांगदेव येथील मंदिरात दर्शनार्थ गेले होते देवदर्शन आटोपून घरी भुसावळला आपल्या मोटर सायकल क्र एम . एच १९ डी एस ३३५६ ने जात असताना वरणगाव नजिकच्या फुलगांव उड्डाणपूलावर अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली .
ढाके दांपत्याची मदत
अपघात झाल्यानंतर बराच वेळ पती पत्नी जागेवर पडून होते या दरम्यान या मार्गावरून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना कोणीही या अपघातग्रस्तांकडे लक्ष दिले नाही . मात्र बऱ्याच वेळानंतर जखमी अवस्थेत असलेल्या नीता नेमाडे ह्या मदती साठी आक्रोश करीत असल्याचे वरणगाव येथील मनोज पंढरीनाथ ढाके हे आपल्या पत्नी सोबत भुसावळला जात असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी इतरांच्या मदतीने अपघातग्रस्तांना तसेच वरणगाव पोलीस स्टेशना घटनेची माहिती देत ग्रामीण रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत केली .
अपघाताचे कारण अस्पष्ट
सदर अपघात कसा घडला हे अस्पष्ट असुन अपघातातील मयत व्यक्तीच्या डोक्याला जबर बसल्याने चेहरा पुर्ण छिन्न विछिन्न अवस्थेत होता . तर त्यांची पत्नी किरकोळ जख्मी झाल्याने हा अपघात कसा ? घडला हे अद्याप अस्पष्ट आहे .याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला जखमी निता ललित नेमाडे यांच्या खबरी वरून अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे


