भुसावळात भरदिवसा सिनेस्टाईल घरफोडी : 15 मिनिटात लाखोंचे दागिने लंपास -मुक्ताई कॉलनीत तीन घरे फोडली :


भुसावळ : कार मधून आलेल्या चोरट्यांनी अत्यंत वर्दळीच्या व पॉश एरीया म्हणून गणल्या जाणार्‍या तापी नगरातील अपार्टमेंटमधील बंद घरात सिनेस्टाईल घरफोडी करीत सुमारे एक लाखांचे दागिने लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. अवघ्या 15 मिनिटात दरोडेखोरांनी काम फत्ते केले तर फ्लॅट उघडा दिसल्यानंतर घर मालकिनीने आत प्रवेश करताच चोरट्यांनी महिलेला धक्का देत कार मधून पळ काढला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, दिड वर्षांपूर्वी भुसावळ बिल्डींग मटेरीयल विक्रेता रघुनाथ चुडामण चौधरी यांच्या शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंंटमध्ये 22 जानेवारी 2022 रोजी याच पद्धत्तीने चोरी करीत सुमारे सहा लाखांचा ऐवज लांबवला होता मात्र अद्यापही ही घरफोडी उघडकीस आलेली नाही. दरम्यान, भुसावळात घरात दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच मुक्ताई कॉलनीतही चोरट्यांनी तीन घरे फोडल्याचा प्रकार समोर आल्याने भुसावळकरांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.

भुसावळातील तापी नगरातील चोपडे बिल्डींगनजीक शालिन व्हिला या अपार्टमेंटमध्ये सदगुरु पेट्रोल पंपाचे मॅनेजर हरीष किशन मदनानी हे पत्नी रेखा यांच्यासह वास्तव्यास आहेत. हरीष मदनानी हे गुरुवारी अकोला येथे कामानिमित्त गेल्याने पत्नी रेखा या घरी एकट्याच होत्या व दात दुखत असल्याने दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास तापी नगर रीक्षा स्टॉपजवळील श्री डेंटल दवाखान्यात प्लॅटला कुलूप लावून गेल्या. पाळत ठेवून असलेल्या व पॉश कपडे परीधान केलेल्या चार चोरट्यांनी स्वीप्टद्वारे दाखल होत एकाने चारचाकी सुरू ठेवत पहारा दिला तर दुसर्‍याने शालिन व्हिलातील जिन्यात पहारा दिला तर अन्य दोघांनी प्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करीत तीन तोळे वजनाच्या व 75 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 12 हजार 500 रुपये किंमतीचे पाच ग्रॅमचे टॉप्स व 12 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट असा एक लाखांचा ऐवज लांबवला.

सूत्रांच्या माहितीनुसार, हरीष मदनानी यांच्या घरातून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर रोकड लांबवली असून मदनानी गावाहून परत आल्यानंतर रोकडचा तपशील कळू शकणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, परप्रांतीय टोळी असल्याची शक्यता असून चारचाकीतून येवून अशा प्रकारच्या चोर्‍या धुळे व नगर जिल्ह्यातही झाल्याचे सांगण्यात आले.

घर मालकिनीला धक्का देत चोरट्यांचे पलायन
सुमारे 20 मिनिटात रेखा या दवाखान्यातील काम आटोपून प्लॅटमध्ये परतल्या असता त्यांना दरवाजा उघडा दिसल्याने पती आल्याचे समजून त्या आतमध्ये शिरताच 25 ते 30 वयोगटातील चोरट्यांनी त्यांना धक्का देत पलायन केले. यावेळी त्यांनी ‘चोर चोर’ असे ओरडल्याने अपार्टमेंटमधील नागरीक बाहेर आले व त्यांनीदेखील चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र काही क्षणातच 25 ते 30 वयोगटातील चारही चोरटे स्वीप्टमधून भरधाव वेगाने पसार झाले.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघन व पोलिसांनी घटनास्थळी भेट देत नेमका प्रकार जाणून घेतला. या प्रकरणी रेखा मदनानी यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी या परीसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात चारचाकीत जाणारे चार चोरटे कैद झाले असून वाहनाच्या नंबरप्लेट आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलीस पथकाने नशिराबाद, फेकरी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले असून गांधी पुतळा तसेच यावल रोड भागातूनही सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

मुक्ताई कॉलनीत तीन प्लॅट फोडले
शहरातील मुक्ताई कॉलनीतील ओंकार हाईट या अपार्टमेंट मध्ये गुरुवारी दुपारी चोरी केली. सुरेश शंकर नेहेते यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तर आतमध्ये महिला असल्याने त्यांनी तेथून पळ काढला तर याच अपार्टमेंटमधील राहुल शिवाजी पाटील यांच्या प्लॅटमधून आठ हजारांची रोकड अर्धा ग्रॅम सोने लांबवण्यात आले तर अजित उंबरे यांच्याही फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न झाला मात्र काहीही नसल्याने रीकाम्या हाताने चोरटे परतले.