भुसावळ – शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवरील द वर्ल्ड स्कूलजवळ शनिवार रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन लाखात एक किलो सोन्याचे मनी देण्याची थाप मारून फसवणुकीचा प्रकार करण्यापूर्वीच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकातील कर्मचार्यांनी आंतरराज्यीय भामट्यांना जेरबंद करून कारवाई केली .
शहर परिसरात सुमारे ४ ते ५ दिवसापासून दोन इसम काचेपासून बनवलेले मंदिरे वगैरे विकण्याचा बहाणा करून लोकांना हेरून त्यांच्याशी इतर विषयाशी चर्चा करून आमच्याकडे सोन्याचे दागिने आहेत. हे दागिने आम्हाला खोदकाम करतांना जमिनीत पुरलेले मिळून आले आहे. सोने हे १ ते दीड किलोचे असून ते कोणालाही कळू न देता ५ लाख रुपयात विकणे आहे. असे जे लोक त्यांच्या संपर्कात आले त्यांना फसवणूक करण्याच्या हेतूने सांगत होते. ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली.
यावेळी पोलिस पथकातील पोलिस हवालदार सुरज पाटील, रमण सुरळकर, पोना यासिन पिंजारी यांनी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनानुसार ३-४ दिवसापासून त्यांच्या मागावर होते. या प्रकरणात आरोपी हे अगदी चाणाक्ष असल्याने वेळोवेळी गुंगारा देत होते. मात्र पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे शिरपूर कन्हाळा रोडवरील वर्ल्ड स्कूलजवळ सापळा रचून दोन इसम ठिकाणावर आल्याची खात्री होताच आरोपींना जेरबंद केले. आरोपींच्या हातातील नकली सोन्याचे दागिने तपासून ताब्यात घेतले व त्यांच्या जवळील पाचशे रुपयाची नकली नोटांचे बंडल आरोपींच्या हातात देऊन हात वर करून पथकाला इशारा दिला. त्यानुसार पथकाने दोघ इसमांवर झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील सुमारे १ किलो वजनाचे बनावट सोने मुद्देमाल हस्तगत केले. या आरोपींना गाव, नाव विचारले असता किसनलाल दौलतराम बागरी (वय ३६ रा. बल्लुर ता. जि. सिरोही राजस्थान ), बाबूलाल ओबाराम बागरी वय ४२ रा. लक्ष्मीनगर, बिबल्सर ता. जि. जालोद, राजस्थान) असे सांगितले. या आरोपींविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पो.नी. विलास शेंडे, पो.हे.कॉ. सूरज पाटील, रमण सुरळकर, गणेश राठोड, यासीम पिंजारी करीत आहेत.
अज्ञात, अनोळखींकडून खोट बोलून फसवणूक करणार्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच बनावट सोने देण्याच्या बहाण्याने नजीकच्या कलावधीत अशा पद्धतीने फसवणूक झाली असल्यास त्यांनी भुसावळ तालुका पो.स्टे. यांचेशी संपर्क करावा, असे पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.



