भुसावळ – ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स, बुलढाणा सायकलिंग क्लब व रनबडीज या संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी बुलढाणा फॉरेस्ट मॅरेथॉन संपन्न झाली. 21 किमी, 10 किमी, 5 किमी व 3 किमी या चार गटात ही स्पर्धा संपन्न झाली. यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे तब्बल 35 धावपटू सहभागी झाले होते. त्यापैकी उमेश घुले 21 किमीच्या पुरुष गटात प्रथम तर प्रियंका मंत्री 21 किमीच्या महिला गटात द्वितीय ठरल्या. त्यामुळे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला.
रविवारी सकाळी ठीक 6:15 वाजता बुलढाणा शहरापासून 25 किमी अंतरावर बोथा अभयारण्यात 21 किमीच्या स्पर्धेत सुरुवात झाली. यावेळी स्पर्धेत सुरुवात करण्यासाठी हिरवा झेंडा दाखविण्यासाठी मंचावरील मान्यवरांमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे भुसावळच्या धावपटूंमध्ये विशेष उत्साह जाणवला. त्यानंतर 6.30 वाजता 10 किमी, 6:45 वाजता 5 किमी व 7 वाजता 3 किमीच्या स्पर्धेत सुरुवात झाली. देशभरातून तब्बल 1500 हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
स्पर्धेस सुरुवात झाल्यानंतर घनदाट जंगलातील निर्जन रस्त्यावर धावताना धावपटूंनी एकच जल्लोष केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक सहकार विद्या मंदिराचे बाल गोपाल विद्यार्थी वेगवेगळ्या वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत टाळ्या वाजवून धावपटूंचा उत्साह वाढवीत होते. शिवाय काही विद्यार्थी बँडच्या आवाजात धावपटूंचा वेग वाढवत होते. यामुळे या जंगलात वाघ, सिंह, भालू, चिता आदी वन्यजीव खरोखर धावपटूंना बघण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असल्याचा भास असंख्य धावपटूंना झाला. त्याशिवाय या जंगलात असलेले विविध प्रजातीची माकडे आपल्या आधुनिक पिढीला धावताना प्रत्यक्ष बघत होती.
अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कमालीचा चढ उताराचा उंच सकल रस्ता, ठिकठिकाणी नागमोडी वळणे, कमालीचे कोरडे वातावरण धावपटूंची कमालीची परीक्षा घेत होते. वातावरण इतके कोरडे होते की सर्व झाडांची पाने जणू श्वास रोखून धावपटूंना धावताना बघत आहेत की काय असे जाणवत होते. अशाही अतिशय विषम वातावरणात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू आपल्या चिरपरिचित हिरव्या ऑफिसियल टी-शर्ट मध्ये धावून स्पर्धा पूर्ण करीत होते व सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
35 पैकी 3 धावपटूंनी 5 किमी गटात, 11 धावपटूंनी 10 किमी गटात तर तब्बल 21 धावपटूंनी 21 किमी गटात सहभाग नोंदविला. यापैकी 6 महिलांचा समावेश होता. वैशिष्ट्य म्हणजे यापैकी 10 धावपटू प्रथमच शहराबाहेरील स्पर्धेत सहभागी झाले होते.
सहभागी धावपटूंची नावे:
5 किमी : संदीप सुरवाडे, प्रदीप माळी, डॉ सुनील वाडीले
10 किमी: अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, वर्षा वाडीले, सारंग चौधरी, रमेशसिंग पाटील, सुधाकर सणांसे, इसाक गवळी, अशोक पाटील ,प्रमोद शुक्ला, प्रशांत वंजारी
21 किमी: प्रियंका मंत्री, उमेश घुले, पुनम भंगाळे, प्रिया पाटील, मुकेश चौधरी, संतोष घाडगे ,संजय भदाणे, संतोष मोटवानी ,तरुण बिरिया, प्रदीप सोलंकी ,युवराज सूर्यवंशी, सुरेश सहानी, राजेंद्र ठाकूर, जितेंद्र चौधरी, पंकज कुलकर्णी, अॅड. मोहन देशपांडे, गणसिंग पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, प्रवीण पाटील



