“
भुसावळ – भुसावळ स्पोर्टस् अँड रनर्स असोसिएशनच्या नियमित धावपटू सौ पुनम पंकज कुलकर्णी यानी आतापर्यंत 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला आहे. परंतु लाॅकडाऊन दरम्यान त्यांनी आपले संपूर्ण लक्ष योगाकडे केंद्रित केले व त्यानंतर आयुष मंत्रालय नवी दिल्ली तर्फे आयोजित योगा संबंधित वेगवेगळ्या परीक्षा देण्याचे व त्यामध्ये करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या लेवल उत्तीर्ण केलेल्या होत्या. परंतु नुकतीच 4 जून रोजी घेण्यात आलेल्या अतिशय अवघड अशा लेवल-6 मध्ये त्यांनी 77.50 % गुण मिळवून यश संपादन केले. जे विद्यार्थी लेव्हल -6 उत्तीर्ण करतात त्यांना योगा मास्टर असा किताब आयुष मंत्रालयातर्फे बहाल करण्यात येतो. तसेच वेगवेगळ्या संस्थांमार्फत व सरकारी विभागांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या योगा स्पर्धांमध्ये प्रमाणपत्रावर सहीचा अधिकार हा योगा मास्टर यांना असतो. शिवाय योग शिक्षकांना ते मार्गदर्शन करीत असतात. आतापर्यंत संपूर्ण देशात केवळ 98 लोकांना योगा मास्टर हा किताब बहाल करण्यात आलेला आहे व भुसावळातील त्या प्रथम नागरिक आहेत.
लाॅकडाऊन दरम्यान डॉ. चारुलता पाटील यांनी आयुष मंत्रालयाची योगाची सर्वप्रथम परीक्षा दिली व त्यापासून प्रेरणा मिळाली असे त्यांनी यावेळी सांगितले. पती पंकज कुलकर्णी व संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा तसेच भुसावळ स्पोर्टस् अँड रनर्स असोसिएशनचे सर्व सदस्य यांचे प्रोत्साहन यामुळेच मी हे यश संपादन करू शकले असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या यशाबद्दल भुसावळ स्पोर्टस् अँड रनर्स असोसिएशनचे श्री प्रवीण फालक, प्रवीण पाटील, डॉ. नीलिमा नेहेते, पुनम भंगाळे, डाॅ. चारुलता पाटील, गणसिंग पाटील, सचिन अग्रवाल, प्रवीण वारके, रणजित खरारे, डॉ. तुषार पाटील, ब्रिजेश लाहोटी आदी सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.



