भुसावळ – जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पूजन करून त्यांनाही पुष्प देऊन पाठ्यपुस्तके देण्यात आली.
त्यानंतर मार्गदर्शनपर विविध स्टॉल लावून नवाेगत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. नाव, वजन, उंची, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, मार्गदर्शनपर साहित्य वाटप आदी स्टॉल लावून पालक व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, मंजुषा पाठक, सुनंदा रोझतकर, सविता निंभोरे, ज्योती वाघ, विनोद जयकर, गणेश तांबे, डॉ. जगदीश पाटील आदी शिक्षकांसह अंगणवाडी सेविका भारती सुर्वे, भिकुबाई मोकाशे, मंगला कुंभार, मदतनीस विमलबाई सुर्वे, पूनम सुर्वे, यमुना धनगर यांनी स्टॉलचे नेतृत्व केले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर निपुण भारत अभियानांतर्गत पालक मेळावा घेण्यात आला. पालक मेळाव्यात जळगाव गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ विलास सूर्यवंशी, पंचायत समिती आस्थापना विभागाचे निशांत मोरे, मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती वाघ यांनी करून निपुण भारत अभियानाची माहिती दिली. सुनंदा रोझतकर यांनी आभार मानले. यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.



