भुसावळकरांना मोठा दिलासा : अखेर ग्रामिण रुग्णालय ट्रामा सेंटर येथे शवविच्छेदनाची सुविधा , मृतदेहांची अवहेलना , पोलिस व नातेवाईकांना होणारा त्रास टळणार :


भुसावळ – शहरातील दुर्देवाने अपघात, आत्महत्या, घातपातातील मृत व अकस्मिक मृत्यू झालेल्यांवर शवविच्छेदनाचा प्रश्न महिन्याभरापासून निर्माण झाला होता. पालिका व ग्रामिण रुग्णालय ट्रामा सेंटरच्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे निर्माण झालेल्या या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. ग्रामिण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमधील एका रुममध्ये तात्पुरत्या स्वरुपात पीएम रुम रविवारपासून सुरु करण्यात आले. यामुळे वरणगाव, यावल व जळगाव येथे मृतदेह घेवून जाण्याचा जाच संपणार आहे. मृतांच्या नातेवाईक, पोलिस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांना होणार त्रासापासून दिलासा मिळणार आहे.
पालिकेच्या श्री. संत गाडगेबाबा रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष आहे, मात्र पालिकेकडे शवविच्छेदनासाठी डॉक्टर नसल्याने गेल्या १३ वर्षांपासून ही सुविधा बंद होती. शहरात कोरोनाच्या काळात ग्रामिण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर सुरु झाले, तज्ज्ञ डॉक्टर देखील मिळाले, मात्र या ठिकाणी अद्याप शवविच्छेदन कक्ष उभारणी झाली नाही. डिसेंबर २०२० मध्ये ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी यांनी पालिकेच्या रुग्णालयातील शवविच्छेदन कक्ष स्वत: पुढाकार घेवून नागरिकांच्या सुविधेसाठी मागितला. पालिकेनेही त्यांना तो उपलब्ध करुन दिला. यामुळे येथे शवविच्छेदनासाठी सुविधा सुरु करण्यात आली होती. मात्र ६ मार्च रोजी पालिकेने कुरघोड्या करीत शवविच्छेदन कक्षाला कुलूप ठोकले होते. यानंतर ही सेवा बंद झाली. या दरम्यान शहरात बारागाड्या दुर्घटना, अकस्मात मृत्यू व शनिवारी आयशर घरावर आदळून आलेल्या अपघातातील मृतांवर वरणगाव, जळगाव व यावल येथे शवविच्छेदन करण्यात आले. यामुळे शहरात जनतेने तिव्र रोष व्यक्त केला होता.
दरम्यान
ग्रामिण रुग्णालयात एका रुममध्ये पक्के शवविच्छेदन गृह तयार होत नाही, तोपर्यंत सेवा सुरु करण्यात आली आहे. रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या कक्षाची पाहणी केली.
खडसेंची सुचना, २४ तासांत अंमलबजावणी
म्हाडाच्या माध्यमातून शहरात ७६०० घरे उभारणीच्या संदर्भात शनिवारी माजी मंत्री एकनाथ खडसेंची भुसावळात पत्रकार परिषद झाली. यावेळी शवविच्छेदनाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर खडसेंनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांना संपर्क साधून ही सेवा तातडीने द्यावी, अशी भुमिका मांडली. एकनाथ खडसेंनी हा प्रश्न सोडविण्याची सूचना देताच दुसऱ्या दिवशीच रविवारी पीएम रुम सुरु झाली. यामुळे भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेल्परची सेवा वर्ग करावी
पालिका रुग्णालयातील पीएम रुममध्ये हेल्पर सुरेश हंसकर यांची पालिकेने कंत्राटी स्वरुपात नियुक्ती केली आहे. आता पालिकेचे पीएम रुम बंद झाल्याने पालिकेने हेल्परची सेवा तात्पुरत्या स्वरुपात करार सुरु आहे, तोपर्यंत ग्रामिण रुग्णालयात वर्ग करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा शल्यचिकित्सक पाठपुरावा करणार आहेत. यामुळे ग्रामिण रुग्णालयातील पीएम सेवा देताना मोठी मदत होईल.
शवपेटीचीही सुविधा सुरु
रेल्वेचे जंक्शन असल्याने शहरात अनोळखी मृतांची संख्या अधिक असते. कायद्यानुसार अशा मृतदेहांवर ७२ तासांनी शवविच्छेदन करावे लागते. यामुळे किमान तीन दिवस ठेवावा लागतो. आता ग्रामिण रुग्णालयात एकाच वेळी दोन मृतदेह ठेवता येतील, अशी शवपेटी उपलब्ध आहे. यामुळे पीएम रुममध्येच मृतदेह ठेवता येणार आहे. सायंकाळी किंवा रात्री अपघात मृत झालेले शव देखील पेटीत ठेवता येतील. दु:खाच्या काळातील त्रास कमी होईल
भुसावळसारख्या मोठ्या शहरात दररोज दुर्देवी घटना घडून मृत्यू ओढवतो. मात्र साधी पीएमची सुविधा नसल्याचे कळाल्यावर धक्का बसला. यासंदर्भात शनिवारीच जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील व भुसावळचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरींसोबत चर्चा केली. त्यांनी सकारात्मकता दाखवून ही सेवा सुरु केली. याचे कौतूक वाटते. संपूर्ण भुसावळकरांनाच यामुळे दिलासा मिळाला. ही बाब भुसावळकरांच्या दुखा:च्या काळातील त्रास कमी करणारी आहे.

एकनाथ खडसे, माजी मंत्री.

कायमस्वरुपी प्रश्न सुटला

डिसेंबर २०२० पासून पालिका रुग्णालयातील कक्षात सेवा सुरु केली होती. सुमारे १५५ मृतांवर शवविच्छेदन केले. मात्र पालिकेच्या आडमुठे धोरणाने ही सेवा बंद झाली. या महिन्याभराच्या काळातही दुर्देवाने मृत्यू झालेल्यांवर यावल येथे आम्हीच आमच्या अॅब्युलन्सने शव देवून विच्छेदनाची सेवा दिली. आता तर ग्रामिण रुग्णालतच तात्पुरत्या रुममधून ही सेवा सुरु झाली आहे. यामुळे हा प्रश्न कायमस्वरुपी सुटला आहे.

डॉ. मयुर चौधरी, वैद्यकिय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर, भुसावळ