भुसावळात पालिकेच्या दिव्याखाली अंधार : निविदेपूर्वीच रंगरंगोटीचे काम – माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार


भुसावळ : भुसावळ नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी व शहरातील अन्य भिंतींवर विविध प्रकारचे संदेश व चित्र लेखनाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे मात्र कामांसाठीी एक निविदा 4 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून निविदेपूर्वीच कामांना सुरूवात झाल्याने हा प्रकार म्हणजे मुख्याधिकारी व आरोग्य यंत्रणेने कंत्राटदाराशी हात मिळवणी केल्याची बाब असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश उपाध्याय यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास सचिव, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी व जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे लिखीत तक्रार नोंदवत चौकशीची मागणी केली आहे.
निविदेपूर्वीच काम : भ्रष्टाचाराचा आरोप
वास्तविक निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर कामांना सुरूवात होणे अपेक्षित असताना शहरात मात्र निविदेपूर्वीच कामे सुरू करण्यात आली आहेत त्यामुळे ही बाब म्हणजे मुख्याधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी हात मिळवणी करून शासनाची फसवणूक केली आहे किंवा कसे याची चौकशी होणे सुद्धा गरजेचे असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशी निविदा प्रसिद्ध करणे म्हणजे शासनाला फसवून शासन पैशांचा अपव्यय करण्याची बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.