आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी व्यक्तींवर होणार कारवाई – डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे : प्रत्येक सहभागी मिरवणूकींचे होणार रेकॉर्डिंग :


भुसावळ – आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असून प्रत्येक सहभागी मिरवणूकींचे रेकॉर्डिंग होणार आहे तसेच ३८ जणां विरुद्ध तालुका हद्दीमध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याची माहित्ती भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
रामनवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती याशिवाय सद्यस्थितीमध्ये सुरू असलेला रमजान महिना या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर जयंती उत्सव व सण उत्साहात शांततेत साजरे व्हावे तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने भुसावळ उपविभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच यापूर्वी या प्रकारच्या सण-उत्सव कालावधीमध्ये व मिरवणूक यांच्या दरम्यान गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींची मागील पाच वर्षातील यादी पोलीस स्टेशन निहाय तयार करण्यात आलेली आहेत. त्या पैकी सद्य स्थितीतही सक्रिय असणाऱ्या 38 व्यक्तींवर या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच उत्सव शांततेत साजरे व्हावे म्हणून सीआरपीसी कलम 144 (2 )नुसार भुसावळ शहर व भुसावळ तालुका हद्दीमध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव गुरुवार रोजी उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार दिनांक 9 एप्रिल 2022 ते दिनांक 17 एप्रिल 2022 पर्यंत एकूण नऊ दिवस वरील व्यक्तींना भुसावळ उपविभागाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करणारे आदेश निर्गमित करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
याशिवाय सदरचे उत्सव शांततेत पार पडावे या दृष्टीनं सीआरपीसी 107,सीआरपीसी 110,तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 या अन्वये देखील वेगवेगळ्या प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

रामनवमी,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती तसेच रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.त्याचप्रमाणे सर्व मिरवणूकी दरम्यान व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.
सर्व मिरवणूक उत्सव मंडळाचे आयोजक यांनी देखील आपापले पूर्वनियोजित कार्यक्रम उत्साहात परंतु शांततेत साजरे होतील कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी.असेही डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी कळविले आहे .