भुसावळ – येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त शिवदर्शन सप्ताह ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला 14 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता होईल.
व्याख्यानमालेचे उद्घाटन डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे, जि. प. सदस्य रवींद्र नाना पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शिवजयंती घराघरात साजरी करतांना शिवचरित्र सांगता सांगता त्यांचा वैचारिक वसा समाजमनामध्ये रुजावा व जोपासला जावा या उद्देशाने महाराष्ट्रातील विद्वान व्याख्याते शिवचरित्राचे नानाविध पैलू उलगडून दाखविणार आहेत. डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
दि. 14 रोजी प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ (पुणे) यांचे तुकोबाराय आणि शिवराय या विषयावर व्याख्यान होईल. दि. 15 रोजी युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे (नगर) यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होईल. दि. 16 रोजी शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे (जळगाव) यांचे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समजून घेताना या विषयावर व्याख्यान होईल. दि. 17 रोजी शिवचरित्रकार चंदन पवार (जळगाव) यांचे शिवरायांची नीती या विषयावर व्याख्यान होईल. दिनांक 18 रोजी ह. भ. प. गंगाधर महाराज कुरुंदकर (हिंगोली) यांचे शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान होईल. 19 रोजी डॉ. स्वप्नील छाया विलास चौधरी (औरंगाबाद) यांचे शिवछत्रपतींचा विचार हीच काळाची गरज या विषयावर व्याख्यान होईल. 20 रोजी शिवचरित्रकार प्रेमचंद अहिरराव (धुळे) यांचे स्वराज्याचा राज्यकारभार : लोकशाहीचा आधार या विषयावर व्याख्यान होईल. समारोपीय व्याख्यान दि. 21 रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे होणार असून स्वराज्य आणि धर्म या विषयावर ते श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. सदरची व्याख्यानमाला ऑनलाईन असल्याने तात्काळ लिंक मागवण्यासाठी डी. के. पाटील (9403731368) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे संजीव पाटील यांनी केले आहे.



