एकाच दिवशी होत असलेल्या नेट परीक्षेसह शिक्षक पात्रता परीक्षेने वाढवला मनस्ताप ; शिक्षण खात्याचा भोंगळ कारभाराने पुन्हा संताप : दोन्ही परीक्षांचे फार्म भरलेल्यांपुढे पेच ;

भुसावळ : राज्याच्या शिक्षण विभागातील गोंधळ थांबायला तयार नाही. कोरोनानंतर शाळा उघडण्याची स्थिती, शिक्षकांची उपस्थिती यावरून गोंधळ उडाल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा व युजीसीतर्फे घेण्यात येणारी नेट परीक्षा एकाच दिवशी रविवार, 21 रोजी होत असल्याने दोन्ही परीक्षांसाठी प्रविष्ट असलेल्यांनी नेमकी कोणती परीक्षा द्यावी? असा प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला आहे.

पुन्हा होणार नुकसान
दोन्ही परीक्षांसाठी पात्र असतानाही केवळ एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यानंतर कुठलीही एकाच परीक्षा देता येणार आहे यामुळे आर्थिक नुकसान तर होणारच आहे मात्र करीयरच्या दृष्टीने मोठा फटका बसणार आहे. विशेषतः ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल कारण त्यांना मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त फी भरावी लागते आणि त्यांच्यासाठी कोणतेही महामंडळ किंवा शासन त्यांची फी देत नाही. अश्या विद्यार्थ्यांवर तर हा अन्याय म्हटल्यास चुकीचे ठरू नये. शिक्षण विभागातील अधिकारी एवढे सुस्त कसे? या बेजवाबदार नियोजनामुळे शिक्षण क्षेत्राची नामुष्की तर झालीच पण विद्यार्थ्यांनाही निष्कारण मनस्ताप झाला आहे. टीईटी परीक्षा पुढे ढकलणे हाच एकमेव उपाय असून तो आता लवकर होणार का ? असा प्रश्न विचारणारे पत्रक भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारीणी सदस्य तथा नाशिक विभाग सह संयोजक प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीला दिले आहे.