भुसावळ- शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम शाळेतर्फे शालेय फीसाठी पालकांना सक्ती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही म्हणून अनेक पालकांनी युवासेनेकडे गाऱ्हाणे मांडले होते. भुसावळ युवासेनेतर्फे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधीकारी यांची भेट देऊन या शाळेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीआहे. सर्व पालकांनी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी , दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.वा. पंचायत समिती, भुसावळ येथे चर्चा करून युवासेनेतर्फे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधीकारी यांची भेट घेवून या शाळेवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलीआहे.

कोरोना साथीपायी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व शाळा बंद होत्या. मागील वर्षी ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिलीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून सोमवारी संध्याकाळी अर्धा तास आणि गुरुवारी संध्याकाळी अर्धा तास ऑनलाईन शिक्षण दिले होते. म्हणजे आठवड्यातुन एक तास शिक्षण दिले असतांना फी मात्र पूर्ण १५ हजार रुपये भरावे यासाठी सक्ती डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या शिक्षकांनी केली आहे.
यावर्षी सुद्धा या तिन्हीही वर्गाचे ७० मिनीटांचेच शिक्षण सुरू आहे. शाळा प्रत्यक्ष वर्गांसाठी घेते तितकी फी आॅनलाइन वर्गांसाठी आकारली जाऊ नये. लॉकडाऊनमुळे पालकांना आर्थिक तसेच मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे युवासेना जिल्हा युवाअधिकारी चंद्रकांत शर्मा यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.


