नाशिराबाद येथे भुसावळातील तरुणाचा खून ; गोळीबारसह चॉपरने केले वार ; मुलगा ठार तर बाप गंभीर जखमी ;

खून प्रकरणावरून बाप लेकावर हल्ला: गोळीबारसह चॉपरने केले वार ; मुलगा ठार तर बाप गंभीर जखमी ;
भुसावळ – शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर पूर्ववैमनस्यातुन आज मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री ६:४५ वाजेच्या सुमारास जळगाव कारागृहात असलेल्या मुलाचा जामीन करून त्याला घरी नेत असलेल्या बाप लेकावर मारेकऱ्यांनी भीषण हल्ला चढविला. यामध्ये नुकताच जेलमधून सुटून बाहेर निघालेला मुलगा ठार झाला असून बाप सुद्धा गंभीर जखमी झाला आहे.

जखमी बापावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गुन्हेगारीमुळे पोलिसांची डोकेदुखी मध्ये वाढ झाली आहे.

  याबाबत जखमी झालेले  वडील मनोहर सुरळकर यांनी प्रसार माध्यमांना घडलेला वृतांत  सांगितला. 
  मागील वर्षी ११ ऑक्टोबर २०२० रोजी भुसावळ येथील कैफ शेख जाकीर याचा खून झाला होता. त्याच्या खुनाच्या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यातील एक संशयित धम्मप्रिया मनोहर सुरळकर राहणार भूसावळ होता सध्या तो  जळगाव जिल्हा कारागृहात होता. दरम्यान आज  मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी त्याला जामीन मिळाला. त्याच्या जामिनासाठी त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर (वय ४७, राहणार पंचशील नगर,भुसावळ) हे जळगावला गेले  होते. धम्माप्रियाचा जामीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर  ते घराकडे परतत  असताना नशिराबादच्या पुलाजवळ संशयित मारेकरी समीर शेख जाकीर, चादर वाल्याचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही) व आणखी एक जण दबा धरून बसले होते. दोघेही बापबेटे पुलाजवळ आले असता त्यांनी अचानक दोघावर हल्ला चढविला. यावेळी  त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या तर चॉपर, चाकूने सपासप वार केले या हल्ल्यात दोघा बापबेटयांना बचावाची संधी दिली नाही. यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.

नशिराबाद परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी जखमींना सुरुवातीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. धम्मप्रिया सुरळकर हा मयत झाला असून त्याचे वडील मनोहर सुरळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेवर लक्ष ठेवून असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शांतता आहे. सीएमओ डॉ.नीता पवार यांनी तपासून धम्माप्रिया सुरळकर त्याला मृत घोषित केले.