भुसावळात भांड्याचे दुकानात चोरी : दोघ आरोपी जेरबंद –

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारातील डिस्को टॉवर समोरील राजेंद्र मुळे यांच्या भांड्याच्या दुकानातून चोरट्यांनी 47 हजार रुपये किंमतीचे भांडे चोरी केले होते. 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी आकाश उर्फ चॅम्पियन शाम इंगळे (21, रा.आठवडे बाजार, भुसावळ) व आसीफ शहा शरीफ शहा (32, रा.काझी प्लॉट, भुसावळ) या दोघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 16 हजार 120 रुपयांचे भांडे जप्त करण्यात आले.
तक्रारदार राजेंद्र शंकर मुळे यांचे आठवडे बाजारात भांड्यांचे दुकान असून चोरट्यांनी 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान भांड्यांचे दुकान फोडून त्यातील 47 हजार रुपये किंंमतीचे भांडे लांबवले होते. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुरनं.352/2021, भादंवि 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल होता. बाजारपेठ डीबी शाखेला हा गुन्हा संशयीत आकाश व आसीफ शहाने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत 6 हजर 120 रुपये किंमतीचे भांडे काढून दिले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नेव्हिल बाटली, रवींद्र बिर्‍हाडे, नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, कॉन्स्टेबल चेतन ढाकणे, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली. अधिक तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.