जळगाव – दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झाला. बहुतांश उद्योगांमध्ये कामगार यांना दीर्घ सुटी देण्यात आली किंवा कामगार कपात करावी लागली तर काहींनी वेतन कपात केली. अशाही स्थितीत जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. मध्ये असे काहि न करता विविध कामांसाठी पदांवर नव्याने १०६० जणांना कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊन सामावुन घेतले आहे.

जैन इरिगेशन आणि संलग्न उत्पादक कंपन्यांवर सध्या वित्त पुरवठा विस्कळीत झाल्याचे संकट आहे. तरीही सामाजिक बांधिलकी ठेऊन नियमित सहकारी (कामगार) शिवाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या जैन इरिगेशनच्या जळगाव स्थित आस्थापनामधे ६२५० कायमस्वरूपी सहकारी आहेत याशिवाय सरासरी २५०० ते ४५०० कंत्राटी कामगार गरजेनुसार सेवा पुरवित आहे.
मार्च २०२० पासून भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला. जुलै २०२० पासून विषाणूच्या संसर्गाने बाधित रूग्ण संख्या सप्टेंबरपर्यंत लाखांच्यावर पोहचली. केंद्र सरकारने सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवले. त्यामुळे उद्योगातील उत्पादन निर्मिती थांबली. कच्चामाल पुरवठा थांबला. जे उत्पादन तयार होते ते पोहचवले जात नव्हते. अशा स्थितीत आर्थिक अडचणी अजून वाढल्या. हे सर्व अनुभवाला येत असतानासुद्धा जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाने महामारी व लॉकडाऊन काळात नियमित कामगाराचा रोजगार कमी करायचा नाही असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला.
खाजगी संस्थाना लस विकत घेण्याची परवानगी मिळालेनंतर जैन इरिगेशनने कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करून सर्व सहकाऱ्यांना टोचणी करून घेतली. या लसीकरणाचा लाभ ४६०० कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याशिवाय कामावर येणाऱ्या सर्व सहकारी-कामगारांची लसीकरणाची व्यवस्था करून या सहकाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व तपासणी करण्यासाठी १० डॉक्टर तसेच १७ वैद्यकीय सहाय्यकांचे पथक रोज कार्यरत होते व आहे. जैन इरिगेशन व्यवस्थापनाने वेळोवेळी सहकारी-कामगारांशी परिपत्रकांद्वारे संपर्क करून कोरोनाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आजारपणात घ्यायची काळजी, आजार बरा झाल्यानंतर पश्चात घ्यायची काळजी याविषयी कामगार व त्यांच्या कुटुंबात जागृती केली आणि करीत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपर्कातून होतो हे लक्षात घेऊन उत्पादन निर्मिती पाळ्यांमध्ये अर्धा तासाचे अंतर वाढविले. या काळात योग्य पद्धतीने कामाची जागा सॅनिटायझर केली. या शिवाय कामगारांमधील अंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार राखले. कंपनीच्या आवारात जेवणाची व्यवस्था बदलली. बंदिस्त जागेतून खुल्याजागेत योग्य अंतरावर बसायची व्यवस्था केली आहे. काही कामगारांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आली. बाहेरगावाहून कंपनीत कामावर येणाऱ्यांसाठी आरोग्याची माहिती देणारे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. रोज कामावर येणार्या सहकार्यांची प्रवेशद्वारावर ऑक्सिमीटर व थर्मामीटरने वेळोवेळी तपासणी केली जाते. तेथे साबणाने हात धुवून सॅनिटायझर फवारणीची व्यवस्था केली आहे.


