भुसावळ : शहरातील जूने व सर्वांत प्रसिध्द असलेल्या सोमाणी गार्डनमधील उद्योजक स्व. गजाधर सोमाणी यांचा अर्धाकृती पुतळा चोरीस गेला आहे. मंगळवारी हा प्रकार निदर्शनास आला. पालिका मालकिच्या या उद्यानातील पुतळ्याच्या चोरी प्रकरणी मात्र पालिका प्रशासन अनभिज्ञ आहे.

दुसखेडा ता. यावल येथे श्री. विध्या पेपर मिल होती ही पेपर मील मुंबईतील उद्योगपती नंदकुमार सोमाणी यांच्या मालकिची होती. सोमाणी परिवाराने सन 1991 ते 1993 दरम्यान पालिकेच्या तत्कालीन बांधकाम सभापती जयश्री न्याती यांच्या माध्यमातून भुसावळ शहरात नगरपालिकेकडून जागा मागून सोमाणी गार्डनची निर्मिती केली होती. चार एकर जागेत सामाजिक बांधीलकी व दातृत्वातून ही वास्तू उभी राहिली होती. सन 1996 मध्ये या सुंदर गार्डनमध्ये उद्योगपती नंदकुमार सोमाणी यांचे वडील स्व. गजाधर सोमाणी यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. सोमाणी परिवाराने एका प्रशस्त व चांगले उद्यान निर्मिती करुन ही वास्तू पालिकेच्या ताब्यात दिली होती. मात्र कालांतराने नगरपालिकेचे या उद्यानाकडे दूर्लक्ष झाले. सध्या गेल्या दहा ते 12 वर्षांपासून तर या उद्यानाची रयाच गेली आहे. आता तर या उद्यानात बसविलेला स्व. सोमाणी यांचाही पुतळा चोरीस गेला आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. पुतळा ब्रांझ धातूचा असावा, म्हणून तो चोरटयांनी गायब केला असावा असाही अंदाज वर्तवला जात आहे. नगरसेवक युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेद्र नाटकर, माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांनी पाहणी केली. दरम्यान या प्रकरणी पालिका प्रशासन मात्र अनिभिज्ञ आहे.


