नाशिक – नाशिक जिल्ह्यातील येवला येथील प्रांताधिकार्याने महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. पीडीतेने याबाबतचा व्हिडिओ बनवून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना पाठवल्यानंतर त्यांनी राज्य सरकारला जाब विचारल्यानंतर प्रांताधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येवला येथील प्रांताधिकारी सोपान सुतार यांनी बदलीस पात्र नसतानाही नियम मोडून महिला तलाठ्याची बदली केली होती. या बदलीविरोधात महिला तलाठ्याने मॅट कोर्टात धाव घेतली. त्यावर, 23 ऑगस्टपर्यंत या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.

प्रांताधिकार्यांविरोधात अखेर गुन्हा
महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आता संबंधित प्रांताधिकार्याविरुद्ध विनयभंग आणि दमदाटीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. त्यामुळे पीडिताने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. प्रांताधिकार्यांनी ऑगस्ट रोजी आपल्या घरी बोलावून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, विरोध केल्यामुळेच त्यांनी आपणास नोटीस पाठवली तसेच आपली विभागीय चौकशी का करु नये, याचा खुलासा मागितला. त्यांच्या नोटीसीला उत्तर दिल्यानंतरही त्यांनी आपली बदली केल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे.


