मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसायीकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, मॉल्सलाही तसेच सर्व दुकाने देखील रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असेही सांगण्यात आले आहे. मात्र धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. ज्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपासून निर्बंधांमध्ये शिथिलता दिलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे 14 दिवस झालेले असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तिंना प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. त्यामध्ये ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचे प्रमाणपत्र हे जर त्या ठिकाणी दाखवले तर, मासिक आणि त्रैमासिक पासेस देण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत. नियम न पाळणाऱ्यांना 500 रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. उपाहारगृहे यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाह सोहळे आहेत, त्याला जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.
खासगी कार्यालये पूर्णपणे सुरू राहतील
शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी या सगळ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे. खासगी औद्योगिक व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांचे ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे. इनडोअर स्पोर्ट्समधील खेळाडू व तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांचे देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असतील तर, जे काही इनडोअर स्पोर्ट्स आहे त्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी सर्व खेळांना परवानगी दिली आहे.
शॉपिंग मॉल्स पूर्ण आठवडाभर 10 वाजेपर्यंत सुरू
शॉपिंग मॉल्स पूर्ण आठवडाभर 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास हरकत नाही, अशी मान्यता दिली गेली आहे. परंतु त्यामध्ये जाणारे जे ग्राहक आहेत, त्यांनी डबल डोस घेतलेला असण्याची आवश्यकता आहे आणि दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल असण्याची आवश्यकता आहे. तसं सर्टिफिकेट दाखवणाऱ्यांना मॉलमध्ये जाण्यास कुठलीही अडचण नाही.


