भुसावळात प्राध्यापकाचे घरी चोरी –


भुसावळ –
शहरातील सुराणा बिल्डींग, विघ्नहर्ता पॅलेस भागातील रहिवासी प्रा.लक्ष्मीनिवास राजगोपालजी सोनी यांच्या बंद घरातून चोरट्यांनी 68 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रा.सोनी हे यवतमाळच्या डीएमएम आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक असून त्यांचे कुटुंब शहरातील सुराणा बिल्डींग, विघ्नहर्ता पॅलेसमधील प्लॅट क्रमांक तीनमध्ये वास्तव्यास आहे. 16 रोजी सोनी कुटुंब जळगाव येथे कामानिमित्त गेले असता घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. रात्री कुटुंब घरी परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले तसेच सामान अस्ताव्यास असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना पोलिसांना माहिती कळवली. चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीची चांदीची नाणी, 12 हजार रुपये किंमतीची सोन्याची काडी तसेच 50 हजारांची रोकड मिळून एकूण 68 हजारांचा ऐवज लांबवला.